कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिंदुत्वाची विचारधारा आणि हिंदू आस्था यामध्ये अंतर असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाव वाद निर्माण झाला आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले की सॉफ्ट हिंदुत्व आणि हार्ड हिंदुत्व हे काय आहे? हिंदुत्व हे हिंदुत्व असतं. मी हिंदू आहे असं सिद्धरामय्या म्हणाले.
आम्ही रामाची पूजा करत नाही का?
सिद्धरामय्या म्हणाले, “हिंदुत्व हे हिंदुत्व असतं. मी एक हिंदू आहे. हिंदुत्व वेगळं आणि हिंदू वेगळा. आम्ही काय रामाची पूजा करत नाही का? फक्त भाजपाचेच लोक रामाची पूजा करतात का? आम्ही रामाचं देऊळ बांधलं नाही का? आम्ही रामाची भजनं गात नाही का? आमच्या गावात डिसेंबर महिन्यात रामाची भजनं गायली जातात. मी देखील त्या गावातल्या परंपरेत सहभागी होत असे. ही प्रथा अनेक गावांमध्ये आहे.आम्ही हिंदू नाही का? ” असा प्रश्न सिद्धरामय्यांनी विचारला आहे.
काँग्रेसने कायमच विभाजनाचं राजकारण केलं
सिद्धरामय्यांच्या या वक्तव्यामुळे जो वाद निर्माण झाला त्यानंतर भाजपाने सिद्धरामय्यांवर आणि काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने कायमच विभाजनाचं राजकारण केलं. भारतात काँग्रेसने फक्त लांगुलचालनाचं राजकारण केलं. तसंच विभाजन म्हणजे दोहोंमध्ये फूट कशी पडेल हेच पाहिलं आहे असा आरोप भाजपा नेते अश्वथ नारायण यांनी केलं आहे. काँग्रेस कडून देशाच्या कायद्याचाही सन्मान केला जात नाही. काँग्रेसला हिंदुत्वाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही असंही नारायण यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- कर्नाटकात पुन्हा टीपू सुलतानचा वाद, मैसूर विमानतळाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावावरुन काँग्रेस भाजपा आमने-सामने
सिद्धरामय्या यांनी फेब्रुवारी महिन्यात विरोधी पक्षनेते असतानाही एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की हिंदुत्व हे संविधानाच्या विरोधात आहे. हिंदुत्व आणि हिंदू धर्म दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मी हिंदुत्वाच्या विरोधात नाही. मात्र मी मनुवाद आणि हिंदुत्व यांचा विरोध करतो. कुठलाही धर्म हत्येचं समर्थन करत नाही. पण हिंदुत्व हत्येचं आणि भेदाभेदाचं समर्थन करतं असा आरोप सिद्धरामय्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा त्यांचं वक्तव्य समोर आलं आहे.