देशभरातील ‘आयआयटी’मध्ये आता परदेशी शिक्षकांनाही अध्यापन करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना रोजगारविषयक व्हिसा देण्यासाठी निकषांमध्ये बदल करण्याची तयारी केंद्र सरकारने दाखवली आहे. पूर्वी परदेशी नागरिकाला जर वार्षिक वेतन २५ हजार डॉलरपेक्षा अधिक असेल, तरच रोजगारविषयक व्हिसा दिला जात असे. मात्र आता सरकारने निकष बदलण्यात येणार असल्याचे सांगितले. नव्या निकषानुसार १४ हजार डॉलरपेक्षा अधिक वेतन असणाऱ्यांना सरकारकडून रोजगारविषयक व्हिसा मिळू शकतो. परदेशी शिक्षकांना १४ हजार डॉलर वेतन देण्याची तयारी आयआयटीने दाखवली होती. नव्या निकषानुसार परदेशी शिक्षकांना व्हिसा मिळणार असल्याने त्यांना आयआयटीत अध्यापन करण्याची संधी मिळू शकते. सध्या आयआयटीमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने परदेशी शिक्षकांची मागणी वाढली होती. मात्र व्हिसाविषयक जाचक नियमांमुळे या शिक्षकांची भरती करता येत नव्हती. ‘‘व्हिसाविषयक नव्या निकषांची माहिती आयआयटींना कळवण्यात आली आहे. मात्र हा निकष २०१५पर्यंत असेल,’’ अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाने दिली.

Story img Loader