Crime News : मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका सत्र न्यायालयाने माजी नगरसेवक शफीक अन्सारी यांना बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे. महिलेने अन्सारी यांच्या तक्रारीनंतर तिचे घर पाडल्यामुळे तिने अन्सारी यांच्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप केले होते, दरम्यान हे निदर्शनास आल्यानंतर कोर्टाने निर्दोष सुटकेचा निर्णय दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महिलेच्या तक्रारीनंतर स्थानिक प्रशासनाने अन्सारी यांचे घरही पाडून टाकले होते.

महिला आणि तिचा पती यांच्या साक्षीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्याचे निरिक्षण राजगड जिल्ह्यातील प्रथम अतिरिक्त सत्र न्यायाधीश चित्रेंद्र सिंह सोलंकी यांनी यावेळी नोंदवले.

“पीडितेची आरोप करण्यात आलेल्या शफीक अन्सारी यांच्या घरी ठराविक वेळेत असलेली उपस्थिती हिच संशयास्पद आहे. महिलेबरोबर आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचा पीडितेच्या दावा सत्य सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय किंवा वैज्ञानिक पुरावा नाही. तसेच या घटनेबद्दल आपल्या पतीला माहिती देणे किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी झालेला उशीर याबद्दल पीडितेने कोणतेही समाधानकारक कारण दिलेले नाही,” असेही कोर्टाने १४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आपल्या निर्णयात म्हटले आहे.

४ फेब्रुवारी २०२१ रोजी अन्सारीने त्याच्या मुलाच्या लग्नात मदत करण्याच्या बहाण्याने महिलेला आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. इतकेच नाही तर अन्सारीला आश्रय दिल्याच्या आरोपाखाली त्याचा मुलगा आणि त्याच्या भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याच्या आधीच नगरपालिका प्रशासनाने महिलेचे घर अतिक्रमणाविरोधी कारवाईत पाडून टाकले होते. तिच्या इतर शेजाऱ्यांनीही तिच्याविरोधात तक्रार केली होती, ज्यामध्ये त्या घरात अंमली पदार्थांची खरेदी विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

न्यायालयाने असे म्हटले की, अन्सारी हे त्या संबंधित वॉर्डचे नगरसेवक होते आणि अन्सारी आणि परिसरातील रहिवाशांच्या सांगण्यावरून नगरपालिकेने तिचे (महिलेचे) घर पाडले.

Story img Loader