आसाममधील गृह आणि राजकीय विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यांची पत्नी कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच शिलादित्य चेतिया यांनीही आपलं जीवन संपवलं. या घटनेसंदर्भात आसामचे पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी माहिती देताना सांगितलं की, “शिलादित्य चेतिया यांच्या पत्नीचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर काही मिनिटात शिलादित्य चेतिया यांनीही आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. शिलादित्य चेतिया यांच्या पत्नी गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या”, असं जीपी सिंह यांनी सांगितलं.
हेही वाचा : चार व्यक्तींकडून २३ वर्षीय युवकावर लैंगिक अत्याचार; पीडित युवकाची आत्महत्या
दरम्यान, शिलादित्य चेतिया हे २००९ चे आयपीएस अधिकारी आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या पत्नीच्या आजारामुळे ते रजेवर होते. दरम्यान, आसाम सरकारमध्ये सचिव होण्यापूर्वी शिलादित्य चेतिया यांनी राज्याच्या तिनसुकिया आणि सोनितपूर या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. दरम्यान, आता शिलादित्य चेतिया यांच्या मृत्यूच्या घटनेचा तपास पोलीस करणार आहेत, अशी माहिती सांगण्यात येत आहे.