Hisar Viral Video : देशभरात दररोज अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. यातील अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये अपघात, मारामारी संपत्तीचा वाद, अशा अनेक घटना पाहायला मिळतात. आता अशाच प्रकारचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून त्यामागचं कारण ऐकून तुम्ही देखील अवाक् व्हाल. हरियाणामधील हिसार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका महिलेने आपल्याच आईला संपत्तीच्या वादातून मारहाण केल्याची घटना हिसार जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्या व्हिडीओत एक महिला स्वत:च्या वृद्ध आईला कानशिलात मारताना, दाताने चावा घेताना आणि आईचे केस ओढत अमानुषपणे मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणात ही मारहाण संपत्तीच्या वादातून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

व्हायरल व्हिडीओत काय?

एका महिलेने आपल्या आईला संपत्तीच्या वादातून मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओत एक महिला आपल्या वृद्ध आईला बेदम मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी वृद्ध आई जोरात ओरडत होती, पण तरीही मुलीला आईची जराही दया आली नाही. एवढंच नाही तर ‘माझ्या हाताने तू मरशील’, असं ती महिला आईला म्हणत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणात पीडितेच्या मुलाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यांनुसार, आरोपी महिलेविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की, “त्यांच्या बहिणीचे लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर ती बहीण आईबरोबर हिसारच्या आझाद नगरमध्ये राहत होती. फिर्यादीने आरोप केला आहे की त्यांची बहीण त्यांच्या आईचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होती. राहतं घर तिच्या नावावर करण्यासाठी ती आईवर दबाव आणत असल्याचं आरोप फिर्यादीने केला आहे.

पुढे फिर्यादीने असाही आरोप केला आहे की, त्यांच्या आईला घरात कोंडून ठेवण्यात आलं होतं. तसेच जेवण देखील देण्यात आलं नव्हतं. तसेच मी जेव्हा आईला भेटायला जातो, तेव्हा बहीण माझ्यावरही चुकीचे आरोप करते. तसेच आपल्या आईला धमकावते. या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील फिर्यादीने केली आहे. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आझाद नगर पोलिसांनी महिलेवर प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Story img Loader