ख्यातनाम इतिहासकार, स्वातंत्र्य  चळवळीचे गाढे अभ्यासक बिपन चंद्र (८६) यांचे शनिवारी सकाळी गुरगाव येथे निधन झाले. भारताचा स्वातंत्र्यलढा आणि त्यात सहभागी झालेल्या नेत्यांवर बिपन चंद्र यांनी लेखन केले आहे.
त्यांनी मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया फ्रॉम मार्क्‍स टू गांधी, हिस्टरी ऑफ मॉडर्न इंडिया, द राईज अँड ग्रोथ ऑफ इकॉनॉमिक नॅशनॅलिझम इन इंडिया ही पुस्तके लिहिली. ते नॅशनल बुक ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. बिपन चंद्र यांनी २००४-२०१२ या काळात अध्यक्षपद भूषवले होते.
काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहताना असे म्हटले आहे, की बिपन चंद्र यांच्या निधनाने एक महान इतिहासकार आपल्यातून निघून गेला आहे.
पेंग्विन बुक्सचे प्रकाशक चिकी सरकार यांनी सांगितले, की पेंग्विन इंडियाचे ते नावाजलेले लेखक होते. अनेक पिढय़ांनी त्यांची इतिहासाची पुस्तके वाचली. त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. लोधी रोड येथील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर दुपारी  अंत्यसंस्कार करण्यात आले.
बिपन चंद्र हे इतिहासाचे प्राध्यापकही होते. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हय़ात  १९२८ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण लाहोरमधील फोरमन ख्रिश्चन कॉलेज व नंतर अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात झाले होते. बिपन चंद्र हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीवरील अभ्यासात विद्वान होते व महात्मा गांधी हा त्यांच्या अधिकारवाणीचा विषय होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा