अयातुल्ला खोमेनी यांच्या कारकिर्दीत झालेल्या इस्लामिक क्रांतीमुळे इराण आणि अमेरिका यांच्यात साडेतीन दशकांपूर्वी निर्माण झालेले वितुष्ट रविवारी अल्प प्रमाणात का होईना कमी झाले. जागतिक राजकारणात अमेरिकेला शह देण्यासाठी अणुबॉम्बनिर्मितीचा धडाका लावणाऱ्या इराणने याच कार्यक्रमाला तिलांजली देण्याची बीजे रोवणाऱ्या करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकेसह सहा महाशक्तींशी इराणने करार केला असून टप्प्याटप्प्याने अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रम कमी करण्याची हमी जागतिक समुदायाला दिली आहे.
अणुबॉम्बनिर्मितीच्या धडाक्यामुळे अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन व जर्मनी या देशांचे वितुष्ट ओढवून घेणाऱ्या इराणला गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर एकलकोंडेपणाला सामोरे जावे लागत आहे.
अमेरिकेने लादलेल्या आर्थिक र्निबधांमुळे इराणी जनतेच्या हालांना पारावार उरला नव्हता. या सर्व पाश्र्वभूमीवर अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम गुंडाळून ठेवून महासत्तांशी करार करण्याचा प्रस्ताव अमेरिकेने इराणसमोर ठेवला होता. त्यावर अखेरीस रविवारी शिक्कामोर्तब झाले.
अमेरिकेचा इशारा
जीनिवात झालेल्या या करारामुळे आता इराणवरील सात अब्ज डॉलपर्यंतचे र्निबध उठविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सहा महिन्यांसाठीच हे र्निबध उठवले जातील असेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे. युरोपीय महासंघाच्या परराष्ट्रधोरण प्रमुख कॅथरिन अॅश्टन यांनी इराणतर्फे महासत्तांच्या प्रतिनिधींश वाटाघाटी केल्या.
“जागतिक समुदायासाठी ही स्वागतार्ह बाब आहे. इराणने चांगले पाऊल उचलले आहे. जगाला असलेला अणुयुद्धाचा धोका त्यामुळे टळेल अशी आशा करायला हरकत नाही. मात्र, सहा महिन्यांत इराणचे वर्तन चांगले रहावे ही अपेक्षाही आहे.”
बराक ओबामा, अमेरिकेचे अध्यक्ष
“भूतकाळ मागे ठेवून जागतिक समुदायाचा विश्वास संपादन करण्यासाठी इराणने टाकलेले हे केवळ पहिले पाऊल आहे. याहून अधिकाधिक प्रयत्न होणे गरजेचे असून नजीकच्या भविष्यात आम्ही तसे करण्याचा प्रयत्न करू.”
मोहम्मद जावेद जरीफ, इराणचे परराष्ट्रमंत्री
करारातील ठळक बाबी
*अणुप्रकल्पांची पाहणी करण्यासाठी जागतिक निरीक्षकांना इराणची संमती
*युरेनियम संपृक्त करण्याचे काम इराण थांबवणार
*युरेनियमचे पाच टक्क्यांपेक्षा अधिक संपृक्तीकरण करणार नाही
*एका विशिष्ट मर्यादेपलीकडे संपृक्त युरेनियमचा साठा करता येणार नाही
* कराराच्या बदल्यात सात अब्ज डॉलरच्या र्निबधांतून इराणला सूट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा