पाकिस्तानातील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ पुन्हा सुरु झाला आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असून लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी सोमवारी याबद्दल माहिती दिली. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील या अतिरेकी तळावर हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास ५०० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत.
बालाकोटमध्ये हा तळ नेमका कुठे आहे
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मानसेहरा जिल्ह्यामध्ये बालाकोट आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून २०० किमी तर अबोटाबादपासून उत्तरेला ६३ किमी अंतरावर बालकोट आहे. अबोटाबादमध्येच अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडो पथकाने मोस्ट वाँटेड दहशतवादी ओसामा बीन लादेनचा खात्मा केला होता.
भारतीय लष्कराने दिले बालाकोटच्या पुढे जाण्याचे संकेत
बालाकोटमधील जाबा टेकडीवर जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ होता. २६ फेब्रुवारील इंडियन एअर फोर्सच्या मिराज-२००० विमानांनी याच ठिकाणी एअर स्ट्राइक केला होता. जाबा टेकडीवर जैशचा हा तळ सहा एकरमध्ये पसरलेला होता. एकाचवेळी ६०० दहशतवादी इथे राहू शकत होते. इंटलिजन्स एजन्सीच्या या रिपोर्टबद्दल इंडियन एक्सप्रेसने एअर स्ट्राइकनंतर माहिती दिली होती.
दहशतवादी तळावर किती जण आहेत. जैशचे कुठले प्रमुख दहशतवादी तिथे आहेत. कॉम्पलेक्समध्ये फिरणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो, शस्त्रांचे भांडार, हॉल, फायरिंग रेज याबद्दलची सर्व माहिती त्या रिपोर्टमध्ये होती. बालाकोटमध्ये मोठया प्रमाणावर मशिदी आणि मदरसे आहेत. अफगाण युद्धात अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठी याच ठिकाणी दहशतवादी तळ उभारण्यात आले. नंतर त्याचा काश्मीरसाठी वापर सुरु झाला.
बालाकोटच्या जवळ असणाऱ्या गऱ्ही हबिबुल्ला येथे हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी प्रशिक्षण तळ आहे. २००५ साली हेराल्ड या पाकिस्तानी मासिकाने मानसेहरा जिल्ह्यामध्ये दहशतवादी प्रशिक्षण तळ सुरु झाल्याची माहिती दिली होती. अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर हे तळ काही वर्ष बंद होते. मसूद अझहरने बालाकोटच्या जैशच्या तळाची जबाबदारी त्याचा भाऊ युसूफ अझहरकडे दिली होती. भारताने जैशबद्दल जो रिपोर्ट तयार केला होता. त्यामध्ये युसूफ अझहर तसेच तो वापरत असलेली गाडी या सर्वांचे फोटो होते.