राजस्थानच्या शाळांमध्ये आता इतिहासात बदल केला जाणार आहे. हल्दीघाटीच्या लढाईत महाराणा प्रताप यांचा विजय झाला होता असा इतिहास शिकवला जाणार आहे. या लढाईत अकबर किंवा महाराणा प्रताप यांच्यापैकी कोणतंही सैन्य जिंकलं नव्हतं असा इतिहास आपण सगळ्यांनीच वाचला होता राजस्थानच्या पाठ्यपुस्तकातही असाच इतिहास शिकवला जात होता. मात्र यापुढे हल्दीघाट लढाईत महाराणा प्रताप यांचा विजय झाला होता असा इतिहास शिकवला जाणार आहे.राजस्थानच्या सगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये हा बदल करण्यात आला आहे
आजवर शिकवण्यात आलेला इतिहास चुकीचा शिकवला गेला होता, आता त्यात बदल करण्यात आला आहे असं राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी म्हटलं आहे. अकबरानं ही लढाई जिंकली असती तर त्यानं ६ वेळा हल्ला का केला असता असाही प्रश्न देवनानी यांनी विचारला आहे. राजस्थान मध्ये सत्ता स्थापनेनंतर लगेचच देवनानी यांनी इतिहासाच्या पुस्तकातून ‘अकबर महान’ हा धडा वगळून टाकला होता. अकबर महान होता तर मग महाराणा प्रताप महान नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आता १० वीच्या सामाजिक शास्त्रातल्या इतिहास या विषयातून हल्दी घाटीची लढाई महाराणा प्रताप यांनीच जिंकली होती असा बदल करण्यात आला आहे.
राजस्थानमध्ये झालेल्या या बदलानंतर इतिहासकार डॉक्टर चंद्रशेखर शर्मा यांनी यासंबंधी एक संशोधन केलं. हल्दीघाटीच्या लढाईत महाराणा प्रताप यांनी अकबराचा पराभव केला होता असं शर्मा यांनी म्हटलं आहे या गोष्टीचा पुरावा म्हणून आपल्या संशोधनात हाती आलेले विजयानंतरचे ताम्रपट त्यांनी जनार्दनराय नागर राजस्थान विद्यापिठात जमा केले आहेत. या ताम्रपटावर राणा प्रताप यांच्या विजयाचा उल्लेख असून राणाप्रताप यांचे दिवाण एकलिंगनाथ यांची सहीदेखील आहे असंही शर्मा यांनी म्हटलं आहे.
एवढंच नाही तर आपला विजय झाला असल्यानं महाराणा प्रताप यांनी जमिनीचे काही भागही आंदण म्हणून दिले होते याचेही पुरावे आढळले आहेत. तसंच जमिनी आंदण देण्याचे अधिकार त्या काळी फक्त राजालाच होते असंही शर्मा यांनी म्हटलं आहे. मुघल सेनापती मानसिंह आणि आसिफ खाँ या हे दोघंही राणाप्रतापासोबत युद्ध हरले होते म्हणून अकबर बादशहा त्यांच्यावर नाराज होता आणि या दोघांनीही दरबारात दोन महिने येऊ नये असं फर्मानही काढलं होतं अशीही माहिती शर्मा यांनी दिली आहे.
डॉक्टर शर्मा यांनी केलेलं हे संशोधन आणि त्यावरील लेख-पुरावे हे भाजप आमदार मोहनलाल गुप्ता यांनी पाहिले. त्यासंदर्भातली खात्रीही त्यांनी करून घेतली आणि त्यानंतर राजस्थान सरकारकडे इतिहासात बदल करण्याची मागणी केली. ज्यानंतर राजस्थान सरकारनं पाठ्यपुस्तकात बदल केला असून आता पाठ्यपुस्तकात हल्दीघाटीची लढाई महाराणा प्रतापच जिंकले असंच शिकवलं जाणार असल्याचं स्पष्ट केलं. एवढंच नाही तर शर्मा यांच्या महत्त्वपूर्ण शोधामुळे राजस्थान विद्यापिठाच्या इतिहास विभागानं ‘स्ट्रगलिंग इंडिया’ या पुस्तकाचं नाव बदलून ‘गोल्डन एरा ऑफ इंडिया’ असं ठेवलं आहे.