PM Narendra Modi – Donald Trump Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला आहे. अमेरिकेकडून नुकतंच रहिवासी कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या भारतीयांना माघारी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. १०४ भारतीयांना घेऊन पहिलं विमान अमृतसर येथे दाखल झाल्यानंतर या मुद्द्यावर रोष व्यक्त होऊ लागला. या पार्श्वभूमीवर झालेल्या मोदींच्या अमेरिका दौऱ्याकडे आणि या दौऱ्यातील त्यांच्या ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीकडे भारतासोबतच अवघ्या जगाचं लक्ष होतं. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या मुक्कामाची व्यवस्था वॉशिंग्टन डीसामधील ऐतिहासिक अशा ब्लेअर हाऊसमध्ये करण्यात आली. ऐतिहासिकदृष्ट्या हे निवासस्थान महत्त्वाचं मानलं जातं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्लेअर हाऊसवर भारताचा तिरंगा!

मोदींचा अमेरिका दौरा आणि ब्लेअर हाऊसमधील त्यांचा मुक्काम या पार्श्वभूमीवर ब्लेअर हाऊसवर भारताचा तिरंगा फडकवण्यात आला. ब्लेअर हाऊसमध्ये आजतागायत अमेरिकेसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या आणि सुप्रसिद्ध व्यक्तींनी मुक्काम केला आहे. त्यात ब्रिटनच्या महाराणी, जपानचे सम्राट आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे. ब्लेअर हाऊसला थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं गेस्ट हाऊस म्हणूनही ओळखलं जातं. मोदींच्या मुक्कामामुळे हे ब्लेअर हाऊस सध्या चर्चेत आलं आहे.

काय आहे ब्लेअर हाऊसचा इतिहास?

जवळपास २०० वर्षं जुन्या ब्लेअर हाऊसचं बांधकाम १८२४ साली झालं होतं. या घराचा इतिहास मोठा रंजक आहे. आधी हे वॉशिंग्टनमधील इतर घरांप्रमाणेच बांधण्यात आलं होतं. पण जेव्हा १८३७ मध्ये फ्रान्सिस प्रेस्टन ब्लेअर नावाच्या एका प्रसिद्ध व्यक्तीने हे घर खरेदी केलं, तेव्हा ते घरही चर्चेत आलं. कारण ब्ले्र हे तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्य्रू जॅक्सन यांचे राजकीय सल्लागार आणि जवळचे मित्र मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकांना वॉशिंग्टन डीसीमध्ये फार महत्त्व होतं. तेव्हापासूनच या घराचं नाव ‘ब्लेअर हाऊस’ असं पडलं. १९४२ साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुजवेल्ट यांनी हे घर अमेरिकन सरकारचं अधिकृत गेस्ट हाऊस करण्याचा निर्णय घेतला.

व्हाईट हाऊसमध्येच पाहुणे का मुक्काम करत नाहीत?

दरम्यान, खुद्द व्हाईट हाऊस इतकं मोठं असताना इतक्या महत्त्वाच्या पाहुण्यांच्या मुक्कामासाठी गेस्ट हाऊसची व्यवस्था का? असा प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात एक मजेशीर किस्सा सांगितला जातो. असं म्हटलं जातं की आधी आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे पाहुणे थेट व्हाईट हाऊसमध्येच मुक्कामाला असत. पण एकादा ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल इथे मुक्कामाला असताना मध्यरात्री उशीरा सिगार पीत थेट फ्रँकलिन रुजवेल्ट यांच्या बेडरूमपर्यंत चालत पोहोचले, तेव्हा व्हाईट हाऊस सुरक्षा व्यवस्थेकडून यासंदर्भात पावलं उचलण्यात आली आणि पाहुण्यांची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यासाठी ब्लेअर हाऊसचं रुपांतर अधिकृत गेस्ट हाऊसमध्ये करण्याचा निर्णय १९४२ साली घेण्यात आला.

कसं आहे ब्लेअर हाऊस?

ब्लेअर हाऊस हे वॉशिंग्टन डीसीमध्ये १६५१, पेनसल्वानिया अव्हेन्यू या पत्त्यावर असून थेट व्हाईट हाऊसच्या समोरच आहे. जगभरातल्या अनेक दिग्गज व्यक्तींनी ब्लेअर हाऊसमध्ये अमेरिकन सरकारचे पाहुणे म्हणून मुक्काम केला आहे. त्यामुळे या निवासस्थानाला ‘जगातील सर्वात एक्सक्लुझिव्ह हॉटेल’, असंही म्हटलं जातं. ब्लेअर हाऊस हे एक आलिशान निवासस्थान असून व्हाईट हाऊसचंच एक्स्टेन्शन मानलं जातं.एकूण ७० हजार चौरस फूट परिसरात ते बांधण्यात आलं आहे. ब्लेअर हाऊसमध्ये एकूण ४ भव्य असे टाऊनहाऊस एकमेकांना जोडण्यात आले आहेत. तिथे ११९ खोल्या, १४ गेस्ट बेडरूम, ३५ बाथरूम, तीन डायनिंग रूम आणि एक आलिशान ब्यूटी सलून आहे.

ब्लेअर हाऊसमध्ये अमेरिकन स्थापत्यकलेचे अनेक नमुने पाहायला मिळतात. गेल्या २०० वर्षांत ब्लेअर हाऊसमध्ये वास्तव्य केलेल्या जगभरातल्या दिग्गज मंडळींमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल, इस्रायलयचे पंतप्रधान गोल्ड मेयर, शिमॉन पेरेस, यित्झॅक रॅबिन, ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर अशा अतीमहत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे.