पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन ; नवनिर्मितीचे आवाहन
पीटीआय, भीमावरम (आंध्र प्रदेश)
‘‘भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास हा मर्यादित काळापुरता किंवा ठराविक लोकांपुरताच नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेकांनी स्वातंत्र्यलढय़ात आपले बलिदान दिले. स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने प्रतिबिंबित करणारा आणि समाजातील सर्व घटकांना समान संधी देणारा ‘नवा भारत’ निर्माण करण्याची गरज आहे,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.
येथे थोर स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या ३० फूट उंच कांस्य पुतळय़ाचे अनावरण केल्यानंतर जाहीर सभेस संबोधित करताना मोदी बोलत होते.
ते म्हणाले, की आपल्या सरकारने गेल्या आठ वर्षांत स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विविध धोरणे अंमलात आणली. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नवा भारत हा त्यांच्या स्वप्नांचा भारत असावा. या भारतात गरीब, शेतकरी, मजूर, मागासवर्गीय, आदिवासी आणि दलित यांना समान संधी मिळतील. स्वातंत्र्यलढा हा केवळ काही वर्षांचा, काही प्रदेशांचा किंवा काही लोकांचा इतिहास नाही. हा देशाच्या कानाकोपऱ्याचा इतिहास आहे. हा सर्व कानाकोपऱ्यातील लोकांच्या बलिदानाचा आणि हौतात्म्याचा इतिहास आहे. यातही भारताची विविधता आणि संस्कृती दिसून येते.
इंग्रजांविरुद्ध अल्लुरी यांच्या ‘दम है तो मुझे लो’ या घोषणेचे स्मरण करून मोदी म्हणाले, की अशा घोषणांचा वापर करून देशातील जनतेने स्वातंत्र्यसंग्रामात अनेक आव्हाने आणि संकटांचा धैर्याने सामना केला.
मोदी म्हणाले, ‘‘मला विश्वास आहे की अल्लुरी सीताराम राजू यांच्याकडून मिळालेली प्रेरणा देशाला परमोच्च शिखरावर नेईल. आता नवीन कल्पना आणि नवीन शक्यता निर्माण होत आहेत. तरुण आता आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन देशाला पुढे नेत आहेत. ‘मन्याम वीरुडू’ (वननायक) म्हणून प्रसिद्ध असलेल्या अल्लुरी यांना अभिवादन करताना मोदी म्हणाले, की ते महान स्वातंत्र्यसैनिक होते. ते ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे प्रतीक होते. अल्लुरी सीताराम राजू यांचा जन्म ते हौतात्म्य हा प्रवास आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपले जीवन आदिवासींच्या हक्कासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले.
‘आंध्र देशभक्तांची भूमी!’
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन, तसेच अल्लुरी सीताराम राजू यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे आणि योगायोगाने, हे वर्ष १९२२ मध्ये अल्लुरी यांनी नेतृत्व केलेल्या ‘रम्पा बंडा’ची शताब्दी वर्षही आहे. ते म्हणाले की, अल्लुरीचे जन्मस्थान पांडरंगी गाव आणि जिथे त्यांनी पहिला हल्ला चढवला होता, ते चिंतापल्ली पोलीस ठाण्याचे नूतनीकरण आणि मोगल्लू गावातील अल्लुरी ध्यान मंदिराचे बांधकाम यामागे कृतज्ञतेची भावना आहेत. अल्लुरी आणि इतर आदिवासी योद्धांसाठी लंबासिंगी येथे एक संग्रहालय बांधले जात आहे. पंतप्रधान म्हणाले की, आंध्र प्रदेश ही राष्ट्रध्वजाची रचना करणारे पिंगली व्यंकय्या, कन्नेगंटी हनुमंथू, कंदुकुरी वीरसालिंगम, पोट्टी श्रीरामुलू आणि उय्यालवाडा नरसिंहा रेड्डी यांसारख्या देशभक्त आणि महान व्यक्तींची ही भूमी आहे.