Dr. Manmohan Singh’s Last Press Meet: स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज (दि. २६ डिसेंबर) वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. सर्वपक्षीय नेते त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना २०१४ मध्ये पंतप्रधान पदावर असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वतःबद्दल केलेल्या एका विधानाची आता पुन्हा चर्चा होत आहे. यूपीए २ च्या काळात डिजिटल मीडिया आणि इतर माध्यमात डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. याच पार्श्वभूमीवर त्यांना शेवटच्या पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले होते.

३ जानेवारी २०१४ रोजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटची पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला १०० हून अधिक पत्रकार उपस्थित होते. यावेळी त्यांनी तब्बल ६२ हून अधिक प्रश्नांची उत्तरे दिली होती. याच पत्रकार परिषदेत त्यांना एक रोखठोक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचे तेवढेच करारी उत्तर मनमोहन सिंग यांनी दिले.

हे वाचा >> Dr. Manmohan Singh: आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

काय म्हणाले डॉ. मनमोहन सिंग?

डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, “मी कमकुवत पंतप्रधान आहे, असे मी बिलकुल मानत नाही. समकालीन माध्यमे आणि संसदेतील विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्याबद्दल अधिक दयाळू असेल.” ते पुढ म्हणाले, मंत्रिमंडळात चर्चेला आलेली प्रत्येक गोष्ट मी उघड करू शकत नाही. मला वाटते की, आघाडीच्या राजकारणाची परिस्थिती आणि मर्यादा लक्षात घेऊन मला जे काही सर्वोत्तम करणे शक्य होते, ते मी केले आहे.

२००९ ते २०१४ या यूपीए २ सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप आणि झाल्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली होती. भाजपाने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करून विकासाचे नवे मॉडेल दाखवले. ज्यामुळे २०१४ च्या लोकसभेत काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. यूपीए २ सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली. मात्र आज दहा वर्षानंतर त्यांच्या योगदानाबद्दल अनेकजण भरभरून बोलताना दिसत आहेत.

पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडीओ पाहा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आज भारत शोक व्यक्त करत आहे. सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉ. मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे लिहिले, “डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आमच्यात नेहमी सुसंवाद होत असे. शासनाशी संबंधित अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत असू. यावेळी त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता पाहायला मिळायची. या दुःखद प्रसंगी डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांच्या प्रती मी सहसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती…”

Story img Loader