Donald Trump advise to Israel: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे यंदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला इराणच्या अणुआस्थापनांवर हल्ला सर्वात आधी हल्ला करण्याचा सल्ला दिला आहे. नॉर्थ कॅरोलविना येथे प्रचार सभेत बोलत असताना ट्रम्प यांनी हे विधान केले. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दोन दिवसांपूर्वी मध्य आशियातील सर्व देशांना युद्धातून बाहेर पडण्याची सूचना दिली होती, त्यानंतर ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे. इस्रायल आणि इराण यांच्यामधील संघर्ष थांबवून मध्य आशियातील तणाव कमी करण्यावर बायडेन यांनी भर दिला होता.
इराणकडून दोन दिवसांपूर्वी इस्रायलवर २०० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. यातील बहुतेक क्षेपणास्त्र इस्रायलच्या आर्यन डोम यंत्रणेने हवेतच निकामी केली. त्यानंतर इस्रायल इराणवर हल्ला करणार असल्याचे नेत्यानाहू यांनी जाहीर केले होते. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात बायडेन यांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. पत्रकारांनी बायडेन यांना विचारले की, तुम्ही इराणच्या बाबतीत काय विचार करता? इस्रायलच्या जागी तुम्ही असता तर काय केले असते? यावर बायडेन म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे ते अणुआस्थापनांवर तरी हल्ले करणार नाहीत. या संभाषणाचा हवाला देऊन ट्रम्प म्हणाले, “पण अणुआस्थापनांवर तर सर्वात आधी हल्ले केले पाहीजेत ना?”
हे वाचा >> विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?
ट्रम्प पुढे म्हणाले, “तुम्हाला सर्वात आधी अण्वस्त्रावर हल्ले चढवावे लागतील. कारण अण्वस्त्र हीच सर्वात मोठी चिंता आहे. जो बायडेन यांनी इस्रायलला सांगायला हवे होते की, तुम्ही इराणच्या अणुआस्थापनांवर हल्ले करा आणि त्यानंतरचे नंतर बघून घेऊ.”
जर इस्रायलला हल्ला करायचा असेल तर ते नक्कीच करतील. पण त्यांच्या काय योजना आहेत, यावर आपले लक्ष असायला हवे, असेही ट्रम्प म्हणाले.
हे ही वाचा >> इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतातील विमान वाहतुकीवर, तिकिटं महागली अन् प्रवासाचं अंतरही वाढलं; कारण काय?
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दोन दिवसांपूर्वीच मध्य आशियात युद्ध होण्याची शक्यता नाकारली होती. त्यानंतर ७८ वर्षीय ट्रम्प यांनी त्यांचा दावा खोडून काढला आहे. लेबनान आणि इराण इस्रायलला डिवचत असल्यामुळे मध्य आशियात युद्ध भडकण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न बायडेन यांना विचारण्यात आला होता. यावर बायडेन म्हणाले होते, आज पाऊस पडेल की नाही याबाबत तुम्हाला किती विश्वास वाटतो? पण मला मात्र मध्य आशियात युद्ध होणार नाही, याचा पूर्ण विश्वास आहे. कारण मला वाटते आपण हे टाळू शकतो.