जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम ठरलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यानंतर राजकारण तापायला सुरूवात झाली असून विरोधकांकडून भाजपाला आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं जात आहे. ‘सरदार पटेल स्टेडियम’चे ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे नामकरण केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी तर थेट जर्मनीचा हुकूमशाह हिटलरचा दाखला देत, “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते” अशा शब्दात हल्लाबोल केलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असं ट्विट करत आव्हाड यांनी मोदींचं नाव न घेता त्यांची हिटलरसोबत तुलना केलीये.

दुसरीकडे, ‘सरदार पटेल यांच्या नावे असलेल्या स्टेडियमचं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ करण्यात आलं. हा सरदार पटेलांचा अपमान नाही का? सरदार पटेल यांच्या नावानं मतं मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. गुजराजची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही. सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध घातले होते म्हणून त्यांचा नाव हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही, ‘नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दल खात्री नसल्यानेच स्टेडियमला आपलं नाव दिलं, अशी खरमरीत टीका केली आहे.


दरम्यान, बुधवारी १ लाख ३२ हजार प्रेक्षकसंख्येची क्षमता असणाऱ्या भव्य मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hitler also named stadium on himself politics on motera name change narendra modi stadium sas