सबझार अहमद याच्या खात्म्यानंतर आता हिजबुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नव्या दमाच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. हिजबुल मुजाहिद्दीनच्या या नव्या बॅचचा फोटो बुधवारी इंटरनेटवर व्हायरल झाला. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथील तळावर नव्या तुकडीला प्रशिक्षण दिले जात आहे. या तुकडीत २७ दहशतवाद्यांचा समावेश असून त्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये भारतीय सैन्यबरोबरच्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबझार अहमद ठार मारला गेला होता. त्यानंतर लगेचच दहशतवाद्यांच्या नव्या बॅचचा फोटो व्हायरल झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादाच्या प्रचारासाठी दहशतवाद्यांकडून सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईत मारले गेलेले बुरहान वानी आणि सबझार अहमद हे दोघेही सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करायचे.
हिजबुल कमांडर सबझार अहमद निघाला भित्रा; एन्कांऊटरवेळी एकही गोळी झाडली नाही
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून देशात २० ते २५ दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत माहिती देण्यात आली होती. येत्या काही काळात देशात पुन्हा २६/११ सारखा जीवघेणा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा आहे. सीमेजवळचा प्रदेश आणि देशातील मुख्य शहर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर देशातील सर्व विमानतळं, रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकं, मॉल्स, हॉटेल्स आणि वर्दळीची ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, गृह मंत्रालयाने सर्व सुरक्षा दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सीमेवर घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात असले तरी या वाढत्या घटना पाहता दहशतवाद्यांमध्ये देशाला अस्थिर करण्यासाठीचा कट शिजला जात असल्याचा अंदाज आहे.