WHO On HMPV Virus : कोरोना महामारीनंतर चीनमधून पुन्हा एका नवीन व्हायरसबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. चीनमध्ये HMPV नावाच्या एका नव्या विषाणूचा फैलाव होत असून या व्हायरसची चीनमध्ये अनेक नागरिकांना लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच भारतात देखील या व्हायरसची लागण झालेले तीन रुग्ण आढळून आले आहेत. यासंदर्भात भारत सरकार देखील अलर्ट झालं आहे. मात्र, देशाचे आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी नागरिकांना घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच एचएमपीव्ही हा विषाणू कोरोना एवढा घातक नसल्याचं काही आरोग्यविषयक तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र, आता या एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसच्या प्रादुर्भावासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) महत्वाची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेले वेगवेगळे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच चीनमधील आरोग्य सेवा प्रणालीवर या व्हायरसचा कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच कोणतीही आपत्कालीन घोषणा केली गेलेली नाही, असं डब्ल्यूएचओकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

हेही वाचा : “सात महिन्यांपासून तुरुंगात, भारतीय दूतावासातून कोणी…”, गुरपतवंत पन्नूच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या निखिल गुप्तांची मोठी माहिती

डब्ल्यूएचओने असंही म्हटलं आहे की, हिवाळ्यात श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये वाढ होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, जो हिवाळ्यात आणि वसंत ऋतूमध्ये अनेक पसरतो. मात्र, सर्व देश यासंदर्भात नियमितपणे एचएमपीव्हीचा डेटा तपासत नाहीत आणि प्रकाशितही करत नाहीत. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, श्वासोच्छवासाच्या संसर्गामध्ये वाढ विशेषत: चीनच्या उत्तरेकडील प्रांतांमध्ये दिसून आली आहे. श्वासोच्छवासाच्या संसर्गात झालेली वाढ मर्यादेत असून चीनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्टी केली असून चीनमध्ये हॉस्पिटलचा वापर गेल्या वर्षीपेक्षा कमी झाला आहे. तसेच कोणतीही आपत्कालीन घोषणा करण्यात आलेली नाही, असं डब्ल्यूएचओने म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

डब्ल्यूएचओने अहवालात असंही म्हटलं आहे की, डब्ल्यूएचओ चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तसेच एचएमपीव्ही या विषाणूबाबत कोणतीही आपत्कालीन घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच डब्ल्यूएचओ टीम जागतिक, प्रादेशिक आणि देश पातळीवर श्वासोच्छवासाच्या संसर्गाबाबत लक्ष ठेवून आहे. अहवालात असंही म्हटलं आहे की, सध्या हिवाळा सुरु आहे, तेथे श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. गंभीर आजार असलेल्या लोकांनी शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घेतली पाहिजे, असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hmpv virus news in china and who important information about hmpv virus given by who gkt