HMPV virus not new Says Health minister JP Nadda : कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा चीनमधून एक नवीन व्हायरसबद्दल बातम्या समोर येत आहेत. यानंतर जगभरातील नागरिकांमध्ये चिंतेचा लाट पाहायला मिळत आहे. चीनमध्ये HMPV नावाच्या एका नव्या विषाणूचा फैलाव होऊ लागला असून मोठ्या प्रमाणावर या विषाणूची लागण चीनमध्ये नागरिकांना झाल्याचं सांगितलं जात आहे. भारतात देखील याचे आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान देशाचे आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी एका व्हिडीओ संदेशात लोकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.
एचएमपीव्ही विषाणू हा काही नवीन विषाणू नाही आणि याला घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही असे नड्डा आपल्या निवेदनात म्हणाले आहेत. तसेच सरकार सध्या परिस्थितीवर लक्ष्य ठेवून असल्याची प्रतिक्रिया देखील केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी दिली आहे.
जेपी नड्डा म्हणाले की, आरोग्य विषयक तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की एचएमपीव्ही हा काही नवीन विषाणू नाही. हा २००१ मध्ये आढळून आला होता आणि अनेक वर्षांपासून जगभर पसरत आहे. एचएमपीव्ही हा विषाणू श्वास घेताना हवेचे माध्यमातून हा विषाणू पसरतो आणि हा सर्व वयाच्या नागरिकांना होऊ शकतो. हा विषाणू हिवाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात पसरतो.
पुढे बोलताना आरोग्य मंत्री नड्डा म्हणाले की, चीनमध्ये एचएमपीव्हीचे रुग्णांबद्दल रिपोर्ट समोर आल्यानंतर आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र चीनसह शेजारच्या देशांमधील स्थितीवर लक्ष ठेवून आहे. पुढे ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने घटनेची दखल घेतली आहे आणि लवकराच त्यांचा रिपोर्ट ते आपल्याबरोबर शेअर करतील.नड्डा म्हणाले की, आयसीएमआरने श्वसनासंबंधीच्या व्हायरसच्या आकड्यांचे विश्लेषण केले आहे आणि भारतात कोणत्याही सामान्यत: आढळणाऱ्या श्वसनासंबंधी विषाणूजन्य आजारांमध्ये म्हणजेच इन्फ्लूएन्झा सारखे आजार किंवा गंभीर तीव्र श्वसनाचे आजार यांच्यात कुठलीही वाढ झालेली आढळून आलेली नाही.
हेही वाचा>> HMPV विषाणूची लक्षणं काय? लागण झाल्यास उपाय काय? वाचा काय सांगतात तज्ज्ञ…
केंद्रीय मंत्री नड्डा यांनी सांगितले की, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ४ जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त मॉनिटरिंग गटाची बैठक झाली आहे. एचएमपीव्ही व्हायरस संक्रमणासंबंधी देशातील आरोग्य संस्था आणि सर्व्हेलन्स नेटवर्क सतर्क आहे, कोणत्याही आगामी आरोग्य विषय आव्हानांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहेत. त्यांनी काळजी करण्याचे काही कारण नाही, आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत असेही नड्डा यांनी यावेळी सांगितले.
भारतात तीन रुग्ण आढळले…
आतापर्यंत या विषाणूची लागण झाल्याच्या तीन घटना भारतात समोर आल्या आहेत. यापैकी दोन प्रकरणे ही बंगळुरू येथे आहेत तर तिसरे प्रकरण हे गुजरातच्या अहमदाबाद येथे समोर आले आहे. तीनही लहान मुले आहेत आणि त्यांचे वय एक वर्षापेक्षाही कमी आहे आणि तिन्ही रूग्णांची स्थिती स्थिर असून एकाला डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. तीनही मुलांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांना भारताबाहेर प्रवास केलेला नाही.