‘आप’मधून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले गेल्यानंतर भाजपमध्ये नाराजीचा तीव्र सूर उमटला असून प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयासमोर उग्र निदर्शने केली. यावेळी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातही काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने खळबळ उडाली असून उपाध्याय मात्र या कार्यकर्त्यांची समजूत काढताना दिसत होते.
उपाध्याय यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. दिल्लीच्या महरौली विधानसभा मतदारसंघातून ते इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला गेल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी थेट पक्ष मुख्यालय गाठले आणि प्रवेशद्वाराशी जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांना समजावताना उपाध्याय यांची दमछाक झाली. या प्रकाराने बघ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. उपाध्याय कार्यकर्त्यांना म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष या नात्याने प्रचाराची जबाबदारी माझ्यावर आहे. निवडणूक लढवल्यास मी माझ्याच मतदारसंघात अडकून पडेन. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली. बेदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपाध्याय यांनी मनधरणी करूनही कार्यकर्ते शांत झाले नाहीत. विशेष म्हणजे, बेदी यांच्या भाजप प्रवेशाने अनेक नेत्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यात प्रामुख्याने डॉ. हर्षवर्धन यांच्या समर्थकांचा समावेश आहे. बेदी यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवावी, अशी अनेक नेत्यांची मागणी होती. मात्र बेदी यांना डॉ. हर्षवर्धन यांच्या कृष्णा नगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. तेथे बेदी यांच्या प्रचारावर हर्षवर्धन यांच्या समर्थकांनी बहिष्कार घातला. विशेष म्हणजे डॉ. हर्षवर्धन बेदींच्या प्रचाराला आले होते. मात्र उपस्थित कार्यकर्ते हर्षवर्धन यांचाच जयजयकार करीत होते.
महाराष्ट्रातही धुसफूस..
मुंबई : विधान परिषदेच्या भाजपच्या वाटय़ाला आलेल्या एका जागेवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठबळामुळे भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांची वर्णी लागणार आहे. मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, खजिनदार शायना एन सी, सुजित सिंह ठाकूर यांच्या नावांची चर्चा असताना वाघ यांना उमेदवारी दिली गेल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. पक्षाचे वर्षांनुवर्षे काम करणाऱ्यांना डावलून घटकपक्षांना उमेदवारी दिल्यानेही भाजपमध्ये धुसफूस सुरु झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा