खेळाचे मैदान कोणतेही असो, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मित्रभाव दुर्मिळपणे पहायला मिळतो. मात्र, शनिवारी भारतीय हॉकी फेडरेशनच्या कृतीमुळे या ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ अशी प्रचिती आली. पाकिस्तानातील हॉकीची सूत्रे सांभाळणारी पाकिस्तान हॉकी फेडरेशन सध्या आर्थिक विवंचनेत सापडली आहे. या संघटनेकडे सध्या खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे मानधन देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळेच पाकिस्तान क्रिकेट फेडरेशनने येत्या १० एप्रिलपासून रावळपिंडी येथे सुरू होणारे खेळाडुंचे सराव शिबीर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हे शिबीर रद्द होऊ नये म्हणून हॉकी इंडियाने पुढाकार घेत भारत सरकार किंवा अन्य प्रायोजकांकडून मदत मिळवून देण्याची तयारी दाखविली. २०१६ सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानला खेळायचे असेल तर, येत्या जूनमध्ये नेदरलँडस येथे होणाऱ्या पात्रता फेरीत पाकिस्तानला खेळावे लागेल. त्यादृष्टीने रावळपिंडी येथील सराव शिबिर पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊनच हॉकी इंडियाने पाकिस्तानला मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी हॉकी इंडियाचे सचिव मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या सचिवांना पत्र लिहले आहे.
गेल्यावर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय प्रेक्षकांच्या दिशेने केलेल्या आक्षेपार्ह हावभावांमुळे दोन्ही संघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. पाकिस्तानने ही लढत ४-३ अशी जिंकली होती. मात्र, त्यानंतर उभय संघांमध्ये कोणताही सामना झालेला नाही. मात्र, तो प्रकार तात्पुरता बाजूला ठेवून आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो. कारण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना हॉकीची समृद्ध परंपरा आहे. त्यामुळेच पाकिस्तानी संघाशिवाय २०१६ रिओ ऑलिम्पिकचा आम्ही विचारच करू शकत नसल्याचे अहमद यांनी पाकिस्तान हॉकी फेडरेशनला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Story img Loader