जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान बरोबर संबंध सुधारण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबर चर्चा सुरु करावी. भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा सुरु झाली तरच काश्मीर खोऱ्यातील हिंसाचार थांबेल असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

काश्मीर मुद्यावर भारत-पाकिस्तानमध्ये एकमत होत नाही तो पर्यंत काश्मीरमधून गरीबी, हिंसाचार हद्दपार होऊ शकत नाही. दोन्ही देश आपला पैसा बंदुका, शस्त्र, दारुगोळा खरेदी करण्यावर खर्च करत आहेत. जर हाच पैसा रुग्णालय आणि गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च केला तर अनेक मुलांना उज्वल भविष्य मिळेल असे मुफ्ती म्हणाल्या. काश्मीरमधल्या रुग्णालयात डॉक्टर, शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. पाकिस्तानात जी परिस्थिती आहे तशीच स्थिती जम्मू-काश्मीरमध्ये आहे असे त्या म्हणाल्या.

पाकिस्तान आणि काश्मिरी जनतेबरोबर चर्चा करा त्याशिवाय पर्याय नाही असे त्या म्हणाल्या. राजौरी दौऱ्यात पीडिपीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मंगळवारी संबोधित केले. जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या भल्यासाठी पीडीपीने भाजपाबरोबर आघाडी केली होती असे त्या म्हणाल्या. जनतेसाठी भाजपासोबत जाण्याचा निर्णय आपण घेतला होता. पण भाजपाने विश्वासघात केला. सत्तेत असताना जम्मू-काश्मीरचा विकास होऊ नये यासाठी अडथळे आणण्याचे काम भाजपाने केले असा आरोप त्यांनी केला. काहीही झाले तरी जम्मू-काश्मीरमधून ३५ अ आणि कलम ३७० हटवू दिले जाणार नाही असे त्या म्हणाल्या.

Story img Loader