Sunita Willams Returing on Earth : नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नऊ महिने राहिल्यानंतर घरी परतणार आहेत. या परतीचा सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. आठ दिवसांची मोहिम तब्बल ९ महिने लांबल्याने सर्वांचंच या परतीकडे लक्ष होतं. अखेर त्या मध्यरात्री पृथ्वीतलावर उतरणार असून त्यांच्या परतीचा आनंद त्यांच्या भारतातील नातेवाईकांनीही व्यक्त केला आहे. गुजरातस्थित चुलत भाऊ दिनेश रावल यांनी सुनीता विल्यम्स यांच्या भावाने अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय.

शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर यज्ञ सुरू

“सुनीता विल्यम्स घरी परतत असल्याने तिची आई, भाऊ आणि बहिण सर्व आनंदी आहे. आमचं संपूर्ण कुटुंब आनंदी असून तिच्या परत येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. कधी कधी भीती वाटते की काही गडबड होऊ नये. आम्ही आमच्या गावी देवीची प्रार्थना सुरू केली आहे. वरदाई देवीला हजारो किलो तूप दिलेलं आहे. महादर्शन केलं. गावातील मंदिरात जाऊन आलो. रघुनाथ स्कूल येथे शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर यज्ञ ठेवण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, की ती एक अशी मुलगी आहे जिला जगभरात कसलीच भीती वाटली नाही. आज मला वाटतं की आमच्यासाठी सोनेरी दिवस आहे”, असं सुनीता विल्यम्स यांचे भाऊ दिनेश रावल यांनी सांगितलं.

रामाची उपासना करणारी स्पेसमध्ये गेली

“भारतासाठी हा गौरवाचा दिवस आहे. ती लहान असताना समुद्र किनारी गेली होती. तिथे तिने रेती एकत्र घेऊन त्यावर राम लिहिलं होतं. लहान होती तेव्हाही तिच्यावर रामाचे संस्कार होते. रामाची उपासना करणारी मुलगी आज स्पेसमध्ये गेली आहे. हा भारतासाठी गौरव आहे. गुजरातच्या लोकांसाठी हा गौरव आहे”, असंही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “ती देशाची शान आहे. आम्ही तिच्या परतीसाठी यज्ञ करत आहोत आणि ती परतल्यावर मिठाई वाटून आनंदही व्यक्त करू”, असं रावल यांनी एएनआयला सांगितले.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर निघाले असून ते आज सायंकाळपर्यंत पृथ्वीतलावर पोहोचणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून चार अंतराळवीरांना पृथ्वीवर परत घेऊन जाणाऱ्या स्पेसएक्स क्रू-९ ‘ड्रॅगन फ्रीडम’ कॅप्सूलचे नासाने लाईव्ह प्रक्षेपणही केलं आहे. विल्यम्स आणि विल्मोर हे स्पेसएक्स क्रू ९ चे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्यासोबत आहेत.

विल्यम्स आणि विल्मोर यांनी ५ जून रोजी बोईंग स्टारलाइनर अंतराळयानातून आयएसएसकडे प्रक्षेपण केले होते, त्यानंतर तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर ते आयएसएसवरच राहिले. सप्टेंबर २०२४ मध्ये, नासाने इतर अंतराळयानांसाठी डॉकिंग पोर्ट मोकळे करण्यासाठी स्टारलाइनर यान पुन्हा पृथ्वीवर पाठवले, ते क्रूशिवाय होते. आता, नऊ महिन्यांनंतर विल्यम्स आणि विल्मोर एलोन-मस्कच्या मालकीच्या स्पेस एक्सच्या कॅप्सूलवर पृथ्वीवर परतणार आहेत. आज सायंकाळपर्यंत पृथ्वीवर पोहोचतील.

Story img Loader