करोनाचं संकट कमी झाल्याने दोन वर्षांनी नागरिकांना निर्बंधमुक्त होळी आणि धुळवड साजरी करण्यास मिळत आहे. राज्यात सरकारने निर्बंध लावल्यानंतर विरोधी पक्ष आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला असता हे निर्बंध मागे घेण्यात आले. नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात एकत्र न येता रंगांचा सण साजरा करावा. तसंच करोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात ठेवून दिशानिर्देशांचे पालन करावे, असं आवाहन सरकारने केलं आहे.
दरम्यान होळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर पाण्याचा अपव्यय टाळा असे संदेश फिरत आहेत. या मेसेजेसवर मध्य प्रदेशातील भाजपा नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी प्रतिक्रिया दिली असून काही लोक देशातील तरुणांना दूर लोटण्यासाठी सांस्कृतिक दहशतवाद पसरवत असल्याची टीका केली.
भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “केवळ हिंदूंच्या सणांमध्येच पर्यावरणाविषयी बोलून सांस्कृतिक दहशतवाद पसरवला जात आहे”. पुढे बोलताना ते म्हणाले की, “असे संदेश पसरवत देशातील तरुणांना हिंदू सणांपासून दूर नेण्याचा कट आहे”.
“होळीला पाणी वाचवण्याचा संदेश देऊन काही होणार नाही. जे लोक होळीत पाणी वाचवण्याबद्दल बोलतात ते आपली गाडी चकाचक करण्यासाठी यापेक्षा जास्त पाण्याचा अपव्यय करतात. त्यांनी आधी स्वत:मध्ये सुधारणा करायला हवी. फक्त सणांच्या वेळीच अशा गोष्टी का समोर येतात?”, अशी विचारणा त्यांनी केली आहे. तसंच हे लोक पर्यावरणाच्या नावाखाली संस्कृतीवर हल्ला करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.