गुलाल आणि रंगांची उधळण करून देशभरातील सर्व वयोगटांतील आबालवृद्धांनी होळी व धुळवड शुक्रवारी उत्साहात साजरी केली. परस्परांना मिठाईचे वाटप करून विविध गाण्यांवर नृत्य करून सर्वानी होळीचा आनंद द्विगुणित केला. होळी साजरी करताना बिहार व उत्तर प्रदेशात प्रत्येकी दोघे जण मृत्युमुखी पडल्याच्या घटना वगळता, अन्यत्र होळीच्या सणास कोठेही गालबोट लागले नाही.
परस्परांवर पाणी व रंगांची उधळण करून लोकांनी ‘हॅपी होळी’च्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ‘होली है’ च्या घोषणा देत अनेकांनी इमारतींच्या गच्चींवरून रंगीत पाण्याचे फुगेही फेकले. राजधानीतही तरुण तरुणी व मुलांसह सर्वानी होळी सण उत्साहात साजरा केला.
दरम्यान, ‘होलिका दहन’ झाल्यानंतर एका तलावात आंघोळ करताना बिहारमधील चेनारी गावी सत्यम कुमार (१०) व अयोध्या सिंग (१२) ही दोन मुले गुरुवारी रात्री मरण पावली. तर उत्तर प्रदेशात वाराणसी व इटावा जिल्ह्य़ात होळी साजरी करण्यावरून झालेल्या वादातून दोघां जणांना प्राण गमवावे लागले.
पाकमध्ये होळी साजरी करणाऱ्या हिंदूंच्या संरक्षणासाठी मानवी ढाल
पीटीआय, कराची : पाकिस्तानमध्ये होळी साजरी करणाऱ्या हिंदूंच्या संरक्षणासाठी मानवी ढाल तयार करून पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी अल्पसंख्याक समुदायाबाबत एकजूट दाखवून दिली.
येथील स्वामिनारायण मंदिरात हिंदू नागरिक होळीचा सण साजरा करत असताना, वेगवेगळ्या धार्मिक आणि वांशिक गटांमधील श्रद्धांचे सहअस्तित्व वाढीस लावण्याच्या उद्देशाने नॅशनल स्टुडंट्स फेडरेशनच्या (एनएसएफ) विद्यार्थ्यांनी या परिसरात मानवी ढाल तयार केली. संघटनेच्या एका सदस्याने या संघटनेचे वर्णन अयुब खान यांच्या काळातील ‘पुरोगामी डावी संघटना’ असे केले.आम्ही इमामबाडय़ात शियांबाबत एकजूट दाखवली, तेव्हा विविध प्रकारचा जाच सहन करत असलेल्या पाकिस्तानातील सर्व हिंदूंबाबत आम्ही हेच सौजन्य दाखवणे योग्य आहे, असे संघटनेचे सरचिटणीस फव्वाद हसन यांनी म्हटल्याचे वृत्त ‘डॉन’ या दैनिकाने दिले आहे. हिंदूंच्या मंदिराची विटंबना, मुलींचे जबरीने धर्मातर आणि हिंदूंची संस्कृती व धार्मिक परंपरांचे दमन या कारणांमुळे आम्ही हिंदूंबाबत एकजूट दाखवून त्यांचे संरक्षण केल्याचे हसन यांनी सांगितले.

Story img Loader