प्रसिद्ध हॉलिवुड अभिनेत्री अँजेलिना जोली ही जशी तिच्या अभिनयासाठी, प्रचंड गाजलेल्या व्यक्तिरेखांसाठी, तिच्याभोवतीच्या अद्भुत वलयासाठी ओळखली जाते, तशीच ती तिच्या सामाजिक दृष्टीकोनासाठीही ओळखली जाते. २००१ ते २०१२ या काळात तिनं संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरितांसाठीची गुडविल अॅम्बेसिडर म्हणूनही सेवा दिली होती. त्याशिवाय २०१२ ते २०२२ या काळात अँजेलिना जोलीनं विशेष दूत म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरितांसंबंधीच्या मोहिमांसाठी जगभरात प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतरही अँजेलिना जोली मानवी हक्कांबाबत आपली ठाम भूमिका मांडत राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायल-हमास युद्धासंदर्भात अँजेलिना जोली जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांवर, नेत्यांवर चांगलीच संतापली आहे.
काय घडतंय इस्रायल-गाझा सीमेवर?
अँजेलिना जोलीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासनं इस्रायलच्या भूमीवर रॉकेट हल्ला करत युद्धाला तोंड फोडलं होतं. त्यापाठोपाठ हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून नागरिकांवर अत्याचार चालू केले. याच्या उत्तरादाखल इस्रायलनं हमासच्या दहशतवाद्यांना इस्रायलमधून बाहेर काढतानाच आता पॅलेस्टाईनवर हल्ला चढवला आहे. हवाई हल्ल्यापाठोपाठ इस्रायलच्या फौजा गाझा पट्टीत घुसून हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करताना दिसत आहेत. समुद्री मार्गेही हे हल्ले चालू आहेत. मात्र, या हल्ल्यांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांप्रमाणेच सामान्य पॅलेस्टिनी नागरिकही मृत्यूमुखी पडताना दिसत आहेत.
आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार, हमासच्या हल्ल्यात साधारण १४०० इस्रायली नागरिक व सैनिक मरण पावले होते. तर इस्रायलनं गाझा पट्टीत चढवलेल्या हल्ल्यात ८ हजारांहून जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनमधील परिस्थिती सुधारावी यासाठी जागतिक स्तरावर युद्धबंदीची गरज व्यक्त केली जात असली, तरी त्याबाबत ठाम भूमिका फारसं कुणी मांडताना दिसत नाही. यासंदर्भात अँजेलिना जोलीनं सविस्तर पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.
काय आहे अँजेलिना जोलीच्या पोस्टमध्ये?
अँजेलिना जोलीनं आपल्या पोस्टमध्ये गाझामधील परिस्थिती सांगितली आहे. “ज्यांना कुठेही पळून जायला जागा नाही, अशा अडकून पडलेल्या लोकसंख्येवर हे जाणूनबुजून केलेले बॉम्बहल्ले आहेत. गेल्या दोन दशकांपासून गाझा हे एक खुलं तुरुंग ठरलं आहे. पण आता ते वेगाने एक स्मशानभूमी होत आहे. जे मारले गेले, त्यांच्यातले ४० टक्के लहान मुलं आहेत. संपूर्ण कुटुंबांची हत्या केली जात आहे. हे सगळं जग उघड्या डोळ्यांनी बघत आहे. अनेक देशांच्या सक्रीय मदतीच्या जोरावर लाखो पॅलेस्टिनी नागरिकांवर, मुलांवर, महिलांवर, कुटुंबांवर अमानवी अत्याचार केले जात आहेत. आणि हे सगळं आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करून यातल्या कुणालाही अन्न, औषध, माणुसकीची मदत मिळू न देता चाललंय”, असं अँजेलिना जोलीनं नमूद केलं आहे.
“या सगळ्याकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहून युद्धबंदीची मागणी करण्याला नकार देऊ, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा कौन्सिललाही तसं करण्यास मज्जाव करून जागतिक नेत्यांनी आपला या सगळ्यामध्ये सहभाग असल्याचंच सिद्ध केलं आहे”, अशा शब्दांत अँजेलिना जोलीनं आपला संताप व्यक्त केला आहे.