* रामानुजनच्या प्रमुख भूमिकेत देव पटेल * चित्रीकरणास येत्या सप्टेंबरपासून सुरूवात
भारतातील थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जीवनपट आता हॉलिवूड चित्रपटातून साकारणार असून त्यात स्लमडॉग मिलिऑनर फेम अभिनेता देव पटेल रामानुजनची भूमिका साकारणार आहे. मॅथ्यू ब्राऊन यांचा ‘द मॅन हू न्यू इनफिनिटी-अ लाइफ ऑफ द जिनियस रामानुजन’ हा चित्रपट रॉबर्ट कानिगेल यांच्या याच नावाच्या पुस्तकावर बेतलेला आहे. एडवर्ड आर. प्रेसमन हे या चित्रपटाचे निर्माते असून त्यांनी यापूर्वी अमेरिकन सायको, डॅस बूट, वॉल स्ट्रीट या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. रामानुजन यांच्यावरील चित्रपट हा प्रशिता चौधरी यांची सिनेमॉरफिक एन्टरटेन्मेंट कंपनी, जिम यंग व सोफिया सोंडरव्हॅन यांच्या मदतीने बनवला जात आहे.
कान्स चित्रपट महोत्सवातून प्रेसमन यांनी पीटीआयला फोनवर सांगितले, की मॅथ्यू ब्राऊन यांनी रामानुजन यांच्यावरचे पुस्तक आपल्याला दाखवले. त्यांना त्यावर चित्रपट काढण्याची तीव्र इच्छा होती. हा अतिशय चांगला विषय आहे. ‘द ब्युटिफुल माइंड’सारखाच चित्रपट त्यावर काढता येईल असे आम्हाला वाटते. फक्त यात काही ऐतिहासिक संदर्भही असतील.
रामानुजन यांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते व त्यांनी भारताचा चेहराच बदलून टाकला. या चित्रपटात त्यांची प्रेमकथा सादर केली जात आहे. प्रशिता (वय २७) हे या कान महोत्वास उपस्थित असून ते ‘द काँग्रेस’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. यात ब्रिटिश गणितज्ञ जी.एच.हार्डी यांची भूमिका हॉलिवूड अभिनेताच करणार आहे.
प्रशिता चौधरी यांनी सांगितले, की आपण रामानुजनवरचे हे पुस्तक वाचले आहे व जेव्हा प्रेसमन त्यावर चित्रपट काढण्याच्या विचारात आहेत असे समजले तेव्हा या पुस्तकाचे हक्क विकत घ्यावेत असे आपल्याला वाटले. अशा प्रकारच्या जागतिक चित्रपटनिर्मिती प्रकल्पात काम करायला आपल्याला आवडते. रामानुजन हा महान गणितज्ञ होता, त्यामुळे त्याच्यावर चित्रपट काढायला केव्हाही आवडेल.
येत्या सप्टेंबरमध्ये भारत व इंग्लंडमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले जाईल असे निर्मात्यांनी सांगितले. प्रेसमन यांनी सांगितले, की आम्ही मॅट ब्राऊन यांच्यासह देव पटेलची भेट घेतली. या चित्रपटातील एक निर्माती सोफिया सोंडरव्हॅन ही देवला चांगले ओळखते व त्याला रामानुजनची भूमिका देण्याबाबत तिने उत्सुकता दाखवली आहे. देव पटेलला भेटल्यानंतर आम्हालाही तिचे म्हणणे पटले व त्यालाच ती भूमिका देण्याचे आम्ही ठरवले आहे.
चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग हा आशियात आहे, त्यामुळे हॉलिवूड आंतरराष्ट्रीय प्रकल्पांना खुले आहे. भारत व चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात चित्रपटांना प्रेक्षक मिळू शकतात. प्रमुख भारतीय व पाश्चिमात्य अभिनेत्यांना घेऊन आपण एक कॉमेडी चित्रपटही तयार करीत आहोत, पण तो बिग बजेट आहे असे प्रेसमन यांनी सांगितले. यापूर्वी दिग्दर्शक रॉजर स्पॉटिसवूड यांनी रामानुजन यांच्यावर ‘द फर्स्ट क्लास मॅन’ हा चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे. ते ‘रंग दे बसंती’मधील अभिनेता सिद्धार्थ याला रामानुजनची भूमिका देणार आहेत.
कोण होते रामानुजन
रामानुजन हे स्वयंशिक्षित गणितज्ञ होते. त्यांचा जन्म १८८७ मध्ये दक्षिण भारतात झाला होता. विद्यापीठाची क्रमिक पुस्तके घेऊन ते अभ्यास करीत. त्यांनी तीन वहय़ा भरून गणिते केली होती व त्यांचे निष्कर्ष ते गणितज्ञांकडे पाठवत असत. नंतर जी.एच.हार्डी या ब्रिटिश गणितज्ञाचे लक्ष रामानुजन यांच्याकडे गेले. त्यांच्या आग्रहास्तव ते केंब्रिजला गेले व रामानुजन यांना रॉयल सोसायटीचे फेलो व ट्रिनिटी कॉलेजचे फेलो अशा दोन पदव्या देण्यात आल्या. रामानुजन हे त्यांची पत्नी जानकी हिला सोडून एकटेच इंग्लंडला गेले. ते धार्मिक व आस्तिक होते. त्यांचे वयाच्या बत्तिसाव्या वर्षी निधन झाले.
गणितज्ज्ञ रामानुजन यांच्या जीवनावर हॉलिवूड चित्रपट
* रामानुजनच्या प्रमुख भूमिकेत देव पटेल * चित्रीकरणास येत्या सप्टेंबरपासून सुरूवात भारतातील थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जीवनपट आता हॉलिवूड
First published on: 19-05-2013 at 02:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood movie on ramanujan