पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इजिप्तच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. मात्र, अजूनही त्यांचा अमेरिका दौरा आणि त्यातील घडामोडींची चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे मोदींनी या दौऱ्यात फक्त गुजरातसाठी गुगलचा ग्लोबल फिनटेक सेंटर प्रकल्प आणल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेत मोदींच्या झालेल्या स्वागताचे दाखले सत्ताधाऱ्यांकडून दिले जात आहेत. मोदींच्या उपस्थितीत वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये प्रसिद्ध हॉलिवूड गायिका मेरी मिलबेननं भारताचं राष्ट्रगीत सादर केलं होतं. त्यापाठोपाठ तिनं मोदींच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यावर आता मेरीनं ट्विटरवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
नेमकं काय घडलं?
वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये अनिवासी भारतीयांकडून २४ जून अर्थात शनिवारी मोदींना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाचा समारोप हॉलिवूड गायिका मेरी मिलबेन हिच्या गायनाने झाला. यावेळी मिलबेननं भारताचं राष्ट्रगीत सादर करताच उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मेरीचं गाऊन झाल्यानंतर एकीकडे उपस्थित ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत असताना दुसरीकडे मंचावर उपस्थित असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या पाया पडून मेरीनं त्यांचे आशीर्वाद घेतले.
या सर्व घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मोदींचे आशीर्वाद घेण्यासाठी हॉलिवूड गायिकेनं त्यांच्या पाया पडल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द मेरी मिलबेननं या सगळ्या अनुभवाबाबत तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सविस्तर पोस्ट केली आहे.
“मला सगळ्याच जास्त आवडलेली बाब म्हणजे…”
“माझ्या सादरीकरणातली मला सगळ्या जास्त आवडलेली बाब म्हणजे समोरच्या प्रेक्षकांना (राष्ट्रगीत) गाताना ऐकणं! तुम्ही त्यांच्या गाण्यातून त्यांच्या देशप्रेमाचा अंदाज लावू शकता. त्यांनी अभिमानाने, राष्ट्रभक्तीने आणि अत्यंत तन्मयतेनं त्यांच्या मातृभूमीसाठी गायलं. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी गायलं. मी त्यांचं गाणं ऐकण्यासाठी जवळपास माझं गाणं थांबवलं होतं”, असं मेरीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांच्या पायाला स्पर्श करणं हे…”
दरम्यान, आपल्या सादरीकरणानंतर मेरीनं मोदींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यावर या पोस्टमध्ये मेरी म्हणते, “माझं सादरीकरण झाल्यानंतर मला मोदींसमवेत काही क्षण बोलता आलं यासाठी मी आभारी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठांच्या पायाला स्पर्श करणं म्हणजे त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासारखं असतं. हे एक आदर भावनेचं प्रतीक आहे. एक जागतिक नागरिक म्हणून पंतप्रधान मोदींसारख्या नेत्याचा सन्मान करणं हे मी माझं कर्तव्य मानते”.
या पोस्टमध्ये मेरी मिलबेननं हा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे.