पीटीआय, हिसार (हरियाणा)
गेल्या दशकभरात देशाच्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केले. प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत या सुधारणा घडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हिसारमधील अग्रोहा येथील महाराजा अग्रसेन वैद्याकीय महाविद्यालयाच्या आवारातील महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते झाले. या वेळी नव्याने बांधलेल्या ‘आयसीयू’ कक्षाचे उद्घाटन, पदव्युत्तर वसतिगृहाची पायाभरणी शहांच्या हस्ते करण्यात आली.
शहा यांनी नरेंद्र मोदी सरकारने विविध क्षेत्रांत राबवलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. मोदी सरकारच्या कार्यकाळात दारिद्र्यरेषेखालील २५ कोटी नागरिकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणल्या. तसेच गरिबांसाठी चार कोटी घरांची उभारणी केली, ज्यामुळे २० कोटी लोकांना निवारा मिळाल्याचे शहा यांनी नमूद केले.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ८१ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक घरात शौचालयाची तरतूद केल्याचे शहा यांनी सांगितले. ‘२०१४ पर्यंत या देशातील १२ कोटी कुटुंबांकडे शौचालये नव्हती. शौचालये नसलेल्या कुटुंबांमधील मुलींची अवस्था काय असेल याची कल्पना करा,’ असे शहा म्हणाले. वैद्याकीय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोदी सरकारने बरीच कामे केली आहेत, यावर त्यांनी भर दिला. या प्रसंगी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, राज्य भाजपप्रमुख मोहनलाल बडोली तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.