लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण संपवणार असे ते बोलत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, हा व्हिडीओ खोटा असल्याची प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली. यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणी अहमदाबाद सायबर क्राईमच्या पथकाने काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या संबधित दोघांना अटक केली आहे. तसेच या आधी आसाम पोलिसांनी एकाला अटक केली होती. यासंदर्भातील वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. दरम्यान, अमित शाह यांचा व्हिडीओ हा ए़डिट करून तो व्हायरल केला असल्याचा आरोप आहे. याबाबत आता पोलीस चौकशी करत आहेत.

हेही वाचा : आरक्षण रद्द करण्याच्या कथित व्हिडिओवर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर आरोप करत म्हणाले…

दरम्यान, याच प्रकरणात तेलंगणाचे मुख्यंमत्री रेवंथ रेड्डी यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. रेवंथ रेड्डी यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे त्यांना समन्स बाजवण्यात आले असून १ मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “काँग्रेसकडून खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. भाजपाचा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध नाही”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.

अमित शाह काय म्हणाले होते?

“लोकसभा निवडणुकीत ४०० जागा मिळाल्यानंतर भाजपा आरक्षण रद्द करेल, असा खोटा प्रचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पण यामध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसचा हा दावा खोटा आणि निराधार आहे. भाजपाने कधीही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा विरोध केला नाही. या आरक्षणाला भाजपाचा पाठिंबा आहे”, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister amit shah fake video case in two people arrested marathi news gkt