राजधानी दिल्लीत झालेल्या कंझावाला येथील अपघातात तरूणीचा जीव गेला. तरूणीला धडक देणाऱ्या कारने तिला १२ किमी पर्यंत फरफटत नेलं. यामुळे तरूणीचा अपघातात मृत्यू झाला. तिचे पाय कापले गेले आणि तिच्या अंगावरचे कपडेही फाटून गेले. तिचा मृतदेह पोलिसांना नग्न अवस्थेत मिळाला. या सगळ्या प्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या अपघात प्रकरणाचा विस्तृत अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

काय घडली घटना?

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना दिल्लीच्या कंझावाला भागात एका तरूणीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला. हा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. ही मुलगी स्कुटीवरून घरी चालली होती त्यावेळी तिला ज्या कारने धडक मारली त्या कारने तिला १२ किमीपर्यंत फऱफटवत नेलं. या भीषण आणि तेवढ्याच भयंकर अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांना ज्या ठिकाणी या तरूणीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणाहून थोड्याच अंतरावर एक स्कुटीही सापडली. स्कुटीच्या नंबरवरून तरुणीची ओळख पटली.

हे पण वाचा – Delhi Accident : कारखाली फरफटत नेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला?, शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

या प्रकरणी पोलिसांनी सगळ्या आरोपींना अटक केली आहे. कारच्या नंबरवरून पोलिसांनी आरोपींना शोधलं आहे. मात्र या प्रकरणात अनेक पैलूंवर चौकशी बाकी आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी पोलिसांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी अमित शाह यांनी हे स्पष्ट केलं आहे की पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर अहवाल सादर करावा.

दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन काय सांगितलं?

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन पाचही आरोपी पकडले गेले आहेत ही माहिती दिली आहे. या पाच जणांमध्ये दीपक खन्ना हा कार चालवत होता. तर कारमध्ये अमित खन्ना, कृष्ण, मनोज आणि मिथुन असे पाचजण बसले होते. पोलीस हे आता हाती आलेलं सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे यावरून एक टाइमलाईन तयार केली जाईल अशीही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी हे सांगितलं की या मुलीचा मृतदेह कारमध्ये अडकला होता. १० ते १२ किमीपर्यंत या मुलीचा मृतदेह फरफटत नेला गेला. गाडीने वळण घेत असताना या मुलीचा मृतदेह पडलाही होता. या प्रकरणात मुलीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल मंगळवारी येणार आहे. याबाबतची माहिती दिली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा – Delhi Accident CCTV: स्कुटीला धडक दिल्यानंतर १२ किमीपर्यंत फरफटत नेलं, मृतदेह गाडीखाली असतानाही थांबले नाहीत, पाहा व्हिडीओ

३१ डिसेंबरला काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार या वडील गेल्यानंतर घराची सगळी जबाबदारी या मुलीवरच येऊन पडली होती. सध्या ही तरूणी एका इव्हेंट कंपनीत काम करत होती. तिच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या आईला धक्का बसला आहे तसंच घरातल्या इतर सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या मुलीचं घर दिल्लीतल्या अमन विहारमध्ये आहे. या मुलीच्या घरात आई आणि चार बहिणी आहेत. तसंच दोन लहान भाऊही आहेत. तिचा एक भाऊ १३ वर्षांचा तर दुसरा भाऊ ९ वर्षांचा आहे. या मुलीच्या वडिलांचा मृत्यू ८ वर्षांपूर्वी झाला. तर या मुलीच्या एका बहिणीचं लग्न झालं आहे.

हे पण वाचा – Delhi Car Accident: चालक म्हणाला गाडीखाली काहीतरी अडकलंय, मित्र म्हणाले ‘काही नाही, गाडी चालव’; दिल्ली अपघातातील धक्कादायक खुलासा

कुटुंबीयांनी काय म्हटलं आहे?

३१ डिसेंबरच्या दिवशी आपल्या स्कुटीवर ही मुलगी निघाली होती. तिला तिच्या इव्हेंट कंपनीत काम होतं. संध्यकाळी ६ वाजता या मुलीने घर सोडलं. त्यानंतर तिने रात्री ९ वाजता फोन केला आणि सांगितलं की मला घरी यायला थोडा उशीर होणार आहे. हा तिच्यासोबत झालेला शेवटचा संपर्क होता. त्यानंतर सकाळी ८ वाजता पोलिसांनी तिच्या कुटुंबाला या भीषण अपघाताची आणि मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.