पीटीआय, इम्फाळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मंगळवारी सरकारतर्फे करण्यात आली. भरपाईची रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडून प्रत्येकी ५० टक्के दिली जाईल. याबरोबरच मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचेही जाहीर करण्यात आले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी कुकी समुदायाच्या नेत्यांशी शांतता प्रस्थापित करण्याबद्दल चर्चा केली.

राज्याच्या दौऱ्यावर असलेले अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यादरम्यान सोमवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अफवांचे खंडन करण्यासाठी समर्पित टेलिफोन सेवाही सुरू केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दंगली आणि हिंसाचारामुळे पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, तांदूळ आणि इतर खाद्य उत्पादनांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्या कमी करण्यासाठी या सर्व वस्तू मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जातील याची खबरदारी घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. अमित शहा सोमवारी रात्री गृहसचिव अजय कुमार भल्ला आणि आयबीचे संचालक तपन कुमार डेका यांच्यासह इम्फाळला पोहोचले. त्यानंतर त्यांनी परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली.

दरम्यान, अमित शहा यांनी मंगळवारी चुराचंद्रपूरला भेट दिली. या ठिकाणी सर्वात भीषण दंगली झाल्या होत्या. या भेटीमध्ये शहा यांनी कुकी समुदायाच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी समजून घेतल्या. मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये तणाव कमी होऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी या चर्चा केल्या जात आहेत. मणिपूरमध्ये ३ मेपासून सुरू झालेल्या वांशिक हिंसाचारामध्ये किमान ७५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सद्य:स्थितीचा बंडखोरीशी संबंध नाही – सीडीएस

मणिपूरमध्ये सध्या जे सुरू आहे ते दुर्दैवी असून त्याचा बंडखोरीशी संबंध नाही, असे संरक्षण दलांचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान यांनी पुण्यात सांगितले. राज्यात २०२० मध्ये लष्कर आणि आसाम रायफल्स तैनात असताना परिस्थिती नियंत्रणात होती, त्यामुळे काही कालावधीनंतर लष्कर कमी करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वासही जनरल चौहान यांनी व्यक्त केला.

ममता बॅनर्जीची मणिपूर भेटीसाठी परवानगीची विनंती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहून परवानगी मागितली आहे. मणिपूरमधील घडामोडींवर बॅनर्जी यांचे बारकाईने लक्ष असल्याची माहिती तृणमूल काँग्रेसकडून देण्यात आली. केंद्रीय नेतृत्वाने मणिपूरला भेट देण्यासाठी इतका विलंब का केला, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.

नागरी संघटनांशी शहा यांच्याशी चर्चा

अमित शहा यांनी मंगळवारी राज्यातील महिला नेत्या, महत्त्वाच्या व्यक्ती, नागरी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. सकाळीच सुरू झालेल्या या भेटींमध्ये गृहमंत्र्यांनी विविध समुदायांच्या तक्रारी जाणून घेतल्या. तसेच राज्यात परिस्थिती निवळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबद्दल चर्चा केली. शहा यांनी ट्वीट करून यासंबंधी माहिती दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister amit shah meeting session in manipur amy