भोपाळ : हिंदी भाषेमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पाठय़पुस्तकांचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. अन्य आठ भाषांमध्ये वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण देण्यावर काम सुरू असल्याचेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेश सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला असून स्थानिक भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. मेडिकल बायोकेमिस्ट्री, अ‍ॅनाटॉमी आणि मेडिकल फिजिऑलॉजी या तीन विषयांच्या हिंदीतील पुस्तकांचे शाह यांनी प्रकाशन केले. यावेळी ते म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हिंदीमध्ये बोलतात. यामुळे देशातील युवकांचा आत्मविश्वास वाढला आहे. २०व्या शतकात काही लोकांनी ‘ब्रेन ड्रेन’ची (तज्ज्ञ व्यावसायिकांचे परदेशात जाणे) संकल्पना मांडली. पंतप्रधानांनी ही संकल्पना ‘ब्रेन गेन’मध्ये रूपांतरित केली.’’ मध्य प्रदेशातील भाजप सरकारने हिंदीमध्ये वैद्यकीय शिक्षणाचे मोदींचे स्वप्न पूर्ण केल्याचा अभिमान वाटतो, असेही शहा पुढे म्हणाले.

पाठय़पुस्तकांची भाषा हिंदी असली, तरी त्यातील वैद्यकीय संकल्पना इंग्रजीच ठेवण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, किडनीचा उल्लेख किडनी असाच करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदीमधून शिक्षण घेतले तरी वैद्यकीय भाषेतील सर्व संकल्पना विद्यार्थ्यांना ज्ञात होतील, अशी माहिती मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी दिली.

आता इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड विद्यार्थ्यांना सतावणार नाही. ते आपल्या भाषेमध्ये अभिमानाने शिक्षण घेऊ शकतील.

अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister amit shah releases textbooks in hindi for mbbs students in mp zws