गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. त्यात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वप्नांचा बाजार करणारे गुजरातमध्ये जिंकणार नाहीत, असा टोला अमित शाह यांनी केजरीवालांना लगावला आहे.
गांधीनगर लोकसभा मतदारसंघात अमित शाह यांनी काही प्रकल्पांचे उद्घाटन केलं. त्यानंतर बोलताना अमित शाह यांनी केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “स्वप्नांचा बाजार करणारे गुजरातमध्ये जिंकणार नाहीत. यंदा गुजरातमध्ये भाजपाचे सरकार येईल. भाजपाला मोठ्या प्रमाणात बहुमतही मिळेलं,” असा दावा शाह यांनी केला आहे.
अमित शाह यांनी केलेल्या टीकेला अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अमित शाह तर आपल्या पक्षाच्या विरोधात बोलत आहेत. ते म्हणत आहे की, स्वप्न दाखवणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका. १५ लाख रूपये तुमच्या बँक खात्यात जमा करतो, असे बोलणाऱ्यांवर अजिबात विश्वास नका ठेऊ. दिल्लीत, पंजाबमध्ये वीज मोफत देणाऱ्यांवर विश्वास ठेवा,” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.