Home Ministry Action BSF Officers : गेल्या काही महिन्यांपासून जम्मू काश्मीरसह देशात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. गृह मंत्रालयाने बीएसएफच्या दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवलं आहे. केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक नितीन अग्रवाल आणि स्पेशल डीजी वाय.बी. खुरानिया यांना पदावरून हटवलं आहे. यासंदर्भातील आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा जारी केले आहेत.
नितीन अग्रवाल यांना महासंचालक पदावरून हटवल्यानंतर त्यांना आता मूळ केरळ केडरमध्ये पाठवण्यात आलं आहे. तसेच विशेष डीजी वायबी खुरानिया यांनाही पदावरून हटवून त्यांना ओडिशा केडरमध्ये परत पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या म्हणजेच भारताच्या पाकिस्तान आणि बांगलादेश सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. आता त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे.
नितीन अग्रवाल हे १९८९ च्या बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहेत. तसेच नितीन अग्रवाल हे बीएसएफचे पहिले डीजी असतील ज्यांना महासंचालक पदावरून कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच पदावरून हटवण्यात आलं आहे. याआधी ज्या अधिकाऱ्यांनी बीएसएफच्या महासंचालक पदाचा कार्यकाभार सांभाळला आहे त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. दरम्यान, नितीन अग्रवाल यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ २०२६ मध्ये पूर्ण होणार होता.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गृह मंत्रालयाने मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीला याबात आदेश जारी करण्यास सांगितले होते. त्यानंतर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी घुसखोरीच्या अलीकडच्या काळात वाढत्या घटना पाहता केंद्र सरकारारने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. यावर्षी २१ जुलैपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये २४ चकमकीच्या घटना तसेच ११ दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात १४ लोक आणि १४ सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला आहे.
वायबी खुरानिया यांना ओडिशाच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते, असं म्हटलं जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणताही निर्णय झालेला नाही. बीएसएफची जबाबदारी मिळण्यापूर्वीच त्यांनी ओडिशा पोलीस विभागामध्ये वरिष्ठ पदावर काम पाहिलेलं होतं.