अग्निवीर योजना जाहीर केल्यापासून ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विरोधकांकडून सातत्याने या योजनेवर टीका केली जात आहे. याचे पडसाद लोकसभेत देखील बघायला मिळाले आहेत. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने माजी अग्निवीर जवानांसाठी मोठी घोषणा केली आहे. माजी अग्निवीर जवानांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात १० टक्के पदे राखीव ठेवली जातील असं केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता सीआयएसएफ, बीएसएफ, सीआरपीएफ आणि आरपीएफ सारख्या सशस्त्र दलात माजी अग्निवीर जवानांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच त्यांना शारीरिक चाचणीतदेखील शिथीलता देण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय त्यांना वयोमर्यादेतसुद्धा सूट मिळणार आहे. पहिल्या तुकडीसाठी पाच वर्ष तर पुढच्या तुकड्यांसाठी तीन वर्षांची सुट मिळणार असल्याचे सांगितले जाते आहे.

हेही वाचा – अग्निवीर योजनेला विरोधकांकडून इतका विरोध का केला जातोय?

यासंदर्भात बोलताना, सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल म्हणाले, सीआरपीएफमध्ये माजी अग्निवीरांच्या भरती प्रकिक्रयेसंदर्भातील सर्व व्यवस्था झाली आहे. माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट दिली जाणार आहे. तसेच त्यांनी शारीरिक चाचणीतदेखील सूट दिली जाणार आहे. याशिवाय सीआयएसएफनेही यासंदर्भात सर्व तयारी केली असल्याची माहिती सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह यांनी दिली आहे.

यासंदर्भात बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. माजी अग्निवीर जवानांकडे चार वर्षांचा अनुभव असेल, तसेच ते प्रशिक्षित असतील. बीएसएफसाठी हे फायद्याचं ठरेल. असे ते म्हणाले. तसेच रेल्वे संरक्षण दलातील कॉन्स्टेबल पदाच्या सर्व भरतींमध्ये माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण असेल, अशी प्रतिक्रिया आरपीएफचे महासंचालक मनोज यादव यांनी दिली.

हेही वाच – विश्लेषण : सैन्यदलांसाठी जाहीर झालेली अग्निपथ योजना काय आहे?

अग्निवीर योजना काय आहे?

भारतीय सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी दिली जाते. चार वर्षांच्या कालावधीसाठी (प्रशिक्षण काळासह) त्यांना समाविष्ट केले जाते. तसेच त्यांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) दिले जाते. प्रत्येक अग्निवीरास मासिक वेतनातील ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागते. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये दिले जातात. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना कामगिरीच्या आधारे स्थायी सेवेत दाखल केले जाते. प्रत्येक तुकडीतील २५ टक्के अग्निवीरांना या पद्धतीने स्थायी सेवेत स्थान देण्यात येते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home ministry announced 10 percent reservation for ex agniveer in central armed forces spb