दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृह मंत्रालयाच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल प्राप्त झाला असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. यानंतर तात्काळ बॉम्ब शोधक पथक आणि अग्निशामक बंब घटनास्थळी पाठविण्यात आले. पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, नॉर्थ ब्लॉक पोलिसांना धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर डीएफएसने (दिल्ली फायर सर्विस) हालचाल करत बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पाठविले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी सांगितले की, आमचा शोध सुरू आहे. आतापर्यंत आम्हाला काहीही संशयास्पद आढळलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये लागोपाठ बॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. शाळा, विमानतळ, रुग्णालय आणि तुरुंगाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली गेली आहे.

दिल्लीच्या व्यतिरिक्त जयपूर, लखनऊ, कानपूर आणि अहमदाबाद येथील शाळांनाही बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. दिल्लीमधील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर जवळपास १५० शाळांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढले गेले होते. मेल डॉट आरयू या नावाच्या सर्व्हरमधून बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. दिल्लीमधील शाळांमध्ये स्फोटके लपविल्याची धमकी दिली गेली.

या धमक्यांचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाच्या ईमेलवरून या धमक्या दिल्या गेल्या होत्या. आरोपीने व्हिपीएनचा वापर केल्यामुळे त्याच्या आयपी ॲड्रेसचा शोध घेणे कठीण जात आहे. ज्या व्यक्तीने ईमेल तयार केला, त्याला शोधण्यासाठी आम्ही इंटरपोलची मदत घेत आहोत.

६ मे रोजी गृह मंत्रालयाने अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी एसओपी जाहीर केली जाईल, असे सांगतिले. गृह सचिवांनी दिल्ली पोलिसांना निर्देश देऊन अफवांमुळे तणावाची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले. तसेच सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त करून शाळांमधील सीसीटीव्ही चित्रणाचे परिक्षण करण्यास सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home ministry office receives bomb threat mail bomb squad at spot kvg