ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हा निर्णय घेतला आहे. लंडनच्या ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रात सुएला ब्रेव्हरमन यांनी एक लेख लिहिला होता. त्यात लंडनची पोलीस यंत्रणा पॅलेस्टाईन धार्जिणी आहे असा आरोप केला होता. तसंच येथील यंत्रणेला कायदा सुव्यवस्थेची चिंता नाही असंही लेखात म्हटलं होतं. त्यामुळेच आता त्यांना गृहमंत्रीपदावरुन हाकलण्यात आलं आहे.

हे पण वाचा- अग्रलेख: ऋषींची ‘गृह’शोभा!

सुएला ब्रेव्हरमन यांनी जेव्हा द टाइम्समध्ये लेख लिहून पोलिसांवर आणि पोलीस यंत्रणेवर आरोप केला त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. लंडनमधल्या रस्त्यावर उतरुन टीकाकारांनी आणि विरोधकांनी सुएला ब्रेव्हरमन यांच्या विरोधात निदर्शनं केली होती. त्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केले आहेत. त्याचवेळी त्यांनी सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्रीपदावरुन हकालपट्टी केली आहे.

नेमकं हे प्रकरण काय आहे?

११ नोव्हेंबर हा दिवस युरोपात महत्त्वाचा मानला जातो. १९१९ मध्ये याच दिवशी पहिलं महायुद्ध संपलं होतं. त्या वर्षापासूनच लंडनमध्ये या युद्धात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून साजरा होतो. तसंच शासकीय समारंभही आयोजित केले जातात. शंभरहून अधिक वर्षे ही परंपरा सुरु आहे. याच दिवशी लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थकांचा मेळावा होता. ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन या इस्रायल समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना हा मेळावा पटला नाही. या मेळाव्याची संमती मागण्यासाठी आलेल्या आयोजकांना गृहमंत्री ब्रेव्हरमन यांचं मत काय आहे? हे विचारात न घेता पोलिसांनी संमती दिली. हुतात्मा दिवसाला गालबोट लागणार नाही आणि शासकीय कार्यक्रमांच्या मध्ये या मेळाव्यामुळे बाधा येणार नाही याची काळजी घ्या अशा दोन अटी घालून पोलिसांनी ही परवानगी दिली. मात्र सुएला ब्रेव्हरमन यांना हे मुळीच आवडले नाही. त्यांनी लंडन पोलीस प्रमुखांना बोलवलं आणि या मेळाव्याला संमती देऊ नये असं सुचवलं. यावर पोलीस प्रमुखांनी विनम्र नकार देत ही संमती रद्द करण्यासाठी काहीही सबळ कारण नाही असं सांगितलं. नियम पाळून हा मोर्चा काढला जाईल असंही सांगितलं. यानंतर चिडलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांनी द टाइम्समध्ये लेख लिहिला. ज्यानंतर आता त्यांना गृहमंत्री पदावरुन हटवण्यात आलं आहे.