उत्तराखंड येथील एका शिक्षकाला फेसबुकवर झालेल्या मैत्रिणीचा वाढदिवस करणं चांगलंच महागात पडलं आहे. येथील उधम सिंह नगरमध्ये राहत असलेला शिक्षक हनीट्रॅपचा शिकार झाला आहे. याप्रकरणी शिक्षकाने आयटीआय पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी एका दाम्पत्यासह ४ जणांचा अटक केली आहे.
शिक्षकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर एका तरूणीबरोबर त्याची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांत घट्ट मैत्री झाली. २१ एप्रिलला तरुणीचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी शिक्षक जसपूर खुर्द येथील रुद्राक्ष गार्डनमध्ये पोहचला.
रुद्राक्ष गार्डन येथे गेल्यावर फेसबुकवरील मैत्रिण शिक्षकाला एका रुममध्ये घेऊन गेली. पण, तिथे अचानक तरुणीचे सहकारी रुममध्ये आले. त्यांनी दोघांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकाला २ लाख रुपये मागितले. तसेच, तरुणीच्या सहकाऱ्यांनी शिक्षकाला मारहाणही केली.
यानंतर पीडित शिक्षकाने आपल्या मित्राकडून ३० हजार रुपयांची रोख रक्कम आणि १० हजार रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून दिले. त्यासह तरुणी आणि तिच्या सहकाऱ्यांनी शिक्षकांची दुचाकी, क्रेडिट कार्ड, मोबाईलही हिसकावून घेतला. घडलेल्या प्रकारानंतर शिक्षकाने पोलीस ठाणे गाठत तरुणीसह तिच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.
हेही वाचा : “मला मारण्याची धमकी मिळत आहे, याबद्दल पंतप्रधानांना सांगितलं होतं, पण…”, विनेश फोगाटचं विधान
याप्रकरणी उधम सिंह नगरचे पोलीस अधिकारी डॉ. मंजूनाथ टीसी यांनी म्हटलं, “पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार एका दाम्पत्यासह ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून शिक्षकाची दुचाकी, मोबाईल, क्रेडिट कार्ड आणि २० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.” ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.