एपी, हाँगकाँग : चीनच्या करोना प्रतिबंधासाठीच्या निर्बंधांविरुद्ध व टाळेबंदीविरुद्ध हाँगकाँगमध्ये झालेली निदर्शने ही आणखी एका क्रांतीची निदर्शक आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्याने हाँगकाँगवासीयांनी अशा आंदोलनांत सहभागी होऊ नये, असे आवाहन हाँगकाँगचे सुरक्षा मंत्री ख्रिस तांग यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना तांग म्हणाले, की गेल्या आठवडय़ात देशाच्या सुदूर पश्चिम भागात लागलेल्या प्राणघातक आगीच्या घटनेच्या निषेधार्थ चीनच्या केंद्र सरकारला लक्ष्य करण्यासाठी विद्यापीठ परिसर व शहरातील रस्त्यांवर झालेल्या आंदोलनांत बहुसंख्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न झाला होता. हे आंदोलन उत्स्फूर्त किंवा योगायोगाने झाले नव्हते. तो एक संघटित सुनियोजित प्रयत्न होता. करोनाविषयक कडक निर्बंधांमुळे संतप्त झालेल्या जमावाने चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पायउतार होण्याची मागणी केली. चीनमधील गेल्या दहा वर्षांतील हा सर्वात मोठा असंतोषाचा उद्रेक होता. गेल्या दोन दिवसांत हाँगकाँगच्या चिनी विद्यापीठ, हाँगकाँग विद्यापीठ आणि मध्यवर्ती भागात सौम्य निदर्शने करण्यात आली. यामध्ये चीनचे विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांचा समावेश होता.