Indian astronaut on Moon: चांद्रयान, मंगळयान अशा यशस्वी मोहिमा केल्यानंतर आता चंद्रावर थेट अंतराळवीर उतरविण्यासाठी भारताकडून तयारी सुरू आहे. भारताचा अंतराळवीर चंद्रावर कधी पाऊल ठेवणार याबाबत विज्ञान-तंत्रज्ञान आणि अंतराळ विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नुकतीच माहिती दिली. सीएनएन-न्यूज१८ च्या रायजिंग भारत समिटमध्ये बोलत असताना त्यांनी भारताच्या अंतराळ मोहिमांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, २०४० पर्यंत भारताचा अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवेल. तसेच भारत स्पेस स्टेशन नावाचे भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक २०३५ पर्यंत तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.
“२०४० पर्यंत आम्ही चंद्रावर भारताचा अंतराळवीर उतरवू, अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसेच २०३५ पर्यंत आपले स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्याचाही भारत सरकारचा प्रयत्न आहे”, असे विधान डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रायजिंग भारत समितमध्ये सहभाग घतेला होता. आपल्या भाषणात त्यांनी फाळणीचा उल्लेख करत भारतातील मुस्लिमांनी फाळणीचा विरोध केला होता, असे सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “ध्रुवीकरणाचे राजकारण नवे नाही. अनेक देशांना आजवर स्वातंत्र्य मिळाल्याचे आपण ऐकले. पण फाळणीतून एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे ऐकले आहे का? तेव्हाच्या सामान्य मुस्लीम नागरिकांना दोन देश नको होते. पण सत्तेसाठी काँग्रेसने ध्रुवीकरणाचे राजकारण केले. पण सामान्य मुस्लिमांना काय मिळाले? हा मोठा प्रश्न आहे.”
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दा पुढे नेत असताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, सत्तेच्या लालसेपोटी जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांनी भारताची फाळणी केली. १९४७ साली झालेली फाळणी ही सर्वात मोठी चूक होती. फाळणीची मागणी कुणीही केली नव्हती.
एका देशात दोन पंतप्रधान होऊ शकत नाहीत. म्हणून त्या दोघांनी एक-एक देश बनवला. यांच्या या महत्त्वाकांक्षेचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी देशाचे दोन तुकडे केले. दोन राष्ट्रांचा सिद्धांत चुकीचा ठरला आहे. त्यामुळेच बांगलादेशची निर्मिती झाली आणि बलुचिस्तानमध्ये सध्या अशांतता पसरली आहे, असेही डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.