पीटीआय, अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरातील दहा मजली रुग्णालयाच्या इमारतीच्या तळघरात रविवारी आग लागली आणि परिसरात दाट धुराचे लोट पसरले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे १२५ रुग्णांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील साहिबबाग येथील राजस्थान रुग्णालयात पहाटे साडेचारला ही आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णालयाच्या तळघरात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचे अंशत: नुकसान झाले. रुग्णालयात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे तळघरात ठेवलेल्या अनेक वस्तूंना आग लागली आणि दाट धूर पसरला. दोन तळघरांत दाट धूर असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना तेथे प्रवेश करण्यास अडचणी आल्या. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे आठ तास लागले.