गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पुलाचे नुतनीकरण करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुरबी येथील घटनेची पाहणी करणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर असून, आज ( १ ऑक्टोंबर ) मुरबी येथील दुर्घटनेच्या घटनास्थळी भेट देणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जखमींची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ज्या रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं आहे, त्याची रंगरंगोटी केल्याचं समोर आलं आहे. यावरून विरोधकांनी राज्यातील सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा : ‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरे गटाकडून टीका, म्हणाले “अर्थात, म्हणजे…”
आम आदमी पक्षाने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये रुग्णालयाला रंगरंगोटी करताना काही लोक दिसताना दिसत आहेत. ट्वीटवर लिहलं की, “१४१ लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक बेपत्ता आहेत. दोषींवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही आहे. पण, भाजपाचे कार्यकर्ते फोटोशूटच्या तयारीसाठी रंगरगोटी करण्यात व्यस्त आहेत,” अशी टीका आपने केली आहे.
काँग्रेसनेही आपल्या ट्वीटरवर काही फोटो ट्वीट केले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी रुग्णालयाला रंगरंगोटी आणि नवीन टाइल्स बसवण्यात आल्याचं सांगत पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं आहे. “एवढ्या लोकांचा मृत्यू झाला असून, भाजपाचे लोक रंगरंगोटी करण्यात व्यस्त आहेत. लाज वाटत नाही का?,” असा सवालही काँग्रेसने विचारला आहे.
रुग्णालयात रंगरंगोटी करणाऱ्या कामगारांनी सांगितलं की, या कामासाठी त्यांना राजकोटहून आणलं आहे. संपूर्ण रुग्णालयात रंगरंगोटी आणि दुरुस्तीचे काम सुरु आहे. तसेच, नवीन कुलर आणि बेडही बसवण्यात आले आहेत. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे.