दक्षिणपश्चिम फ्रान्समधील ट्रीबीस येथील सुपर मार्केटमध्ये नागरिकांना ओलीस ठेवणारा हल्लेखोर फ्रेंच पोलिसांच्या कारवाईत मारला गेला आहे. तीन वेगवेगळया घटनांमध्ये तीन जण ठार झाल्याची माहिती आहे. दोन अधिकारीही जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्लाच असल्याचे फ्रान्स सरकारने म्हटले आहे. नागरिकांना ओलीस ठेवणारा हल्लेखोर नोव्हेंबर २०१५ सालच्या पॅरिस हल्ल्यातील दहशतवादी सालाह अबदीस्लामची सुटका करण्याची मागणी करत होता. पॅरिसवरील त्या हल्ल्यात १३० जण ठार झाले होते.

इसिसशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या हल्लेखोराने आठ जणांना बंधक बनवून ठेवल्याचे वृत्त होते. नागरिकांना ओलीस ठेवणाऱ्या हल्लेखोराने पोलिसांवर गोळीबारही केला. दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी पोहोचले असून ते परिस्थिती हाताळत आहे असे फ्रान्स सरकारकडून सांगण्यात आले होते.

फ्रान्समध्ये एकाचवेळी हिंसाचाराच्या दोन वेगवेगळया घटना घडल्या आहेत. ट्रीबीस येथील सुपरमार्केटमध्ये हल्लेखोर घुसलेला असताना तिथूनच १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कारकाससोन्नी येथे एका पोलिसावर गोळीबार करण्यात आल्याची दुसरी घटना घडली आहे.

या दोन्ही घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का ? ते पोलिसांनी अजून स्पष्ट केलेले नाही. फ्रान्सच्या पंतप्रधानांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले असून अंतर्गत मंत्री गेरार्ड कोलाँब हे तात्काळ ट्रिबीसला जाण्यासाठी निघाले आहेत. सकाळी ११.१५ च्या सुमारास एक इसमाने सुपरमार्केटमध्ये प्रवेश केला त्यानंतर गोळीबार झाला असे फ्रान्समधील सूत्रांनी सांगितले. हल्लेखोराने इस्लामिक स्टेटशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. हल्लेखोराचे वय ३० च्या आसपास असून त्याच्याकडे एक ते दोन ग्रेनेड आहेत. मला सीरियाचा बदला घ्यायचा आहे असे हा हल्लेखोर ओरडत होता असे फ्रान्समधील माध्यमांनी म्हटले आहे.

 

Story img Loader