Ayodhya Crime News: उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील एका हॉटेलच्या बाथरूममध्ये महिला आंघोळ करतानाचे व्हिडिओ बनवणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या कर्मचाऱ्याचा मोबाईल तपासला तेव्हा सगळेच थक्क झाले. कारण त्याच्या मोबाईलमधून अनेक अश्लील क्लिप्स आढळल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली असून, या तरुणाकडून आणखी बरीच माहिती मिळू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
सौरभ तिवारी (२५) असे या आरोपीचे नाव असून, तो बहराइच जिल्ह्यातील रहिवासी आहे. राम मंदिराच्या गेट क्रमांक ३ पासून फक्त ५० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.
व्हीआयपी दर्शन मार्ग गेट क्रमांक ३ समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये आरोपी सौरभ एक महिला आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवत होता, तेव्हा त्या महिलेला आरोपीचा सावली दिसली. त्यानंतर ती महिला ओरडत बाथरूममधून बाहेर आली. महिलेचा आवाज ऐकून हॉटेलमधील इतर लोकही घटनास्थळी धावले आणि त्यांनी आरोपी सौरभला पकडले. यानंतर एका महिलेने पोलिसांना फोन करून माहिती दिली.
“आपण अंघोळ करत असल्याचा कोणीतरी व्हिडिओ काढत असल्याचे लक्षात येताच पीडित महिला घबरली, मदतीसाठी ओरडली आणि बाथरूममधून बाहेर पडली. यानंतर हॉटेलमधील इतर पुरुष पाहुण्यांनी तिचा ओरडण्याचा आवाज ऐकला, ते घटनास्थळी धावले आणि त्यांनी आरोपीला पकडले. त्यानंतर त्याला रामजन्मभूमी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले”, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
या प्रकरणातील पीडिता ती गुरुवारी इतर चार जणांसह वाराणसीहून राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आली होती आणि रात्रीसाठी हॉटेलमध्ये राहण्यासाठी दोन खोल्या घेतल्या होत्या.
अयोध्याचे मंडळ अधिकारी आशुतोष तिवारी यांनी आरोपीला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “ही एक अतिशय गंभीर बाब आहे. माहिती मिळताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले. हॉटेलच्या परिसराचीही बारकाईने तपासणी केली जात आहे.
दरम्यान अयोध्या विकास प्राधिकरणाने बेकायदेशीर बांधकामाचा आरोप करत गेस्ट हाऊस सील केले आहे. अयोध्या विकास प्राधिकरणाचे सचिव सत्येंद्र सिंह म्हणाले, “राजा गेस्ट हाऊस प्राधिकरणाच्या कोणत्याही मंजुरीशिवाय बांधण्यात आले होते आणि त्यामुळे ते सील करण्यात आले आहे.”
पोलिसांनी सांगितले की, ते त्याच आस्थापनेत अशा आणखी घटना घडल्या आहेत का आणि व्हिडिओ शेअर केले गेले आहेत का याचा तपास करत आहेत.