Hotmail Founder Sabeer Bhatia on Adhaar: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प म्हणजे आधार अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. देशातल्या प्रत्येक नागरिकाला एकाच व्यवस्थेतली ओळख देणारी आधार प्रणाली विकसित करायला सुरुवात काँग्रेसप्रणीत यूपीएच्या काळातच सुरुवात झाली होती. पण या प्रणालीवर भर देऊन तिचा व्यापक प्रसार एनडीए सरकारच्या काळात झाला. पण या व्यवस्थेवर आता उद्योग क्षेत्रातून मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. ‘हॉटमेल’चे संस्थापक सबीर भाटिया यांनी ‘आधार’ प्रणाली उभी करण्यासाठी खर्च झालेले १३० कोटी डॉलर्स निव्वळ वाया घालवल्याची भूमिका मांडली आहे. बिझनेस टुडेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सबीर भाटिया यांची प्रखर गुप्ता यांनी त्यांच्या ‘प्रखर के प्रवचन’ या पॉडकास्टवर मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांना आधार प्रणालीबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यावर बोलताना “ही प्रणाली तयार करणाऱ्याला कोडिंग जमत नसावं”, अशी टिप्पणी त्यांनी केली.

“१३० कोटी डॉलर्स वाया, २ कोटीतच तयार झालं असतं!”

भाटियांनी यावेळी आधार प्रणालीचं बायोमॅट्रिक माहितीवर अवलंबित्व अधोरेखित केलं. बायमॅट्रिक माहितीवर भर देताना त्याचवेळी उपलब्ध असलेला अतिशय सोपा पर्याय मात्र दुर्लक्षित राहिल्याचं ते म्हणाले. “आधार प्रणाली तुमची सगळी बायोमॅट्रिक माहिती घेते. पण त्या माहितीचं पुढे काय करते? त्या माहितीचा काय वापर होतो? व्हिडीओ आणि तुमचा आवाज यांची माहिती जमवणारी प्रणाली तुलनेनं सोपा पर्याय होता. आपल्या सगळ्यांच्या स्मार्टफोनमध्येही ही प्रणाली उपलब्ध आहे. शिवाय ही प्रणाली आधारसाठी केलेल्या एकूण खर्चाच्या अगदी एका हिश्श्याइतक्या खर्चात तयार झाली असती. तुम्ही ही प्रणाली अवघ्या २ कोटी डॉलर्समध्येही तयार करू शकता”, असं भाटिया यांनी नमूद केलं.

‘आधार’च्या तांत्रिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!

दरम्यान, सबीर भाटियांनी आधार प्रणालीच्या तांत्रिक गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “ज्यानं कुणी ही प्रणाली तयार केली, ते नक्कीच तंत्रज्ञ नसावा. त्यांना तंत्रज्ञान माहितीच नाहीये. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी कोडिंग केलेलं नाही. त्यामुळेच या समस्या उद्भवत आहेत. पण मला माहिती आहे. मी स्वत: माझ्या हातांनी बऱ्याच गोष्टी तयार केल्या आहेत. मला चांगलं माहिती आहे की तंत्रज्ञानाचा कशासाठी वापर केला गेला पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी उपयोगात आणल्या पाहिजेत”, असा दावा सबीर भाटियांनी केला.

“आपले आवाज युनिक असतात. आपले व्हिडीओही युनिक असतात. डेटाबेसमध्ये जमा असणारा आपला आवाज ही आपली युनिक ओळख ठरू शकते. (असं तंत्रज्ञान वापरणाऱ्या) विमानतळावर जेव्हा कुणी प्रवेश करतं, तेव्हा तुम्हाला कुठलं ओळखपत्र दाखवायची गरज पडत नाही. सिस्टीम तुम्हाला या माहितीच्या आधारे ओळखते. याला म्हणतात तंत्रज्ञान आणि त्याचा अतिशय कमी खर्चात वापर करता येऊ शकतो”, असंही भाटियांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hotmail founder sabeer bhatia claims adhaar could have built in 20 million waste of money pmw