तेलंगणामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलंगणातील १२ वी बोर्डाचा (State Board of Intermediate Education – TSBIE) निकाल जाहीर झाल्यानंतर ३० तासांत राज्यातील सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. यात सहा मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचेरियल जिल्ह्यातील तंदूर येथे १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची पहिली घटना घडली. त्यानंतर राज्यभरातून इतर घटना समोर आल्या. पोलिसांनी सांगितले की, सदर मृत विद्यार्थी पहिल्या वर्षाच्या चार विषयांमध्ये नापास झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
या विद्यार्थ्याच्या व्यतिरिक्त राज्यातील इतर भागातून १६ ते १७ वर्षांदरम्यान वय असलेल्या सहा विद्यार्थीनींनी आत्महत्या केली आहे. काहींनी गळफास घेतला, काहींनी गावातील विहिरीत उडी घेतली तर काहींनी तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. हैदराबादच्या नजीक असलेल्या राजेंद्रनगर आणि खम्मम, महबुबाबाद आणि कोल्लूर या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
यावर्षी तेलंगणातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी जेईई मुख्य परीक्षेत यश मिळवले असताना बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देशभरात ५६ विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यातील १५ विद्यार्थी एकट्या तेलंगणातील आहेत. मागच्या तीन वर्षांत तेलंगणातील अनेक विद्यार्थ्यांनी जेईई मुख्य परीक्षेत लक्षवेधी यश मिळविले आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या बोर्ड परीक्षेसाठी ९.८ लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. मागच्यावर्षी पेक्षा यावर्षी दोन आठवडे आधीच परीक्षेचा निकाल यंदा जाहीर करण्यात आला. पहिल्या वर्षाच्या म्हणजेच्या ११वीच्या परीक्षेत ६१ टक्के विद्यार्थी (२.८७ लाख) उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसऱ्या वर्षाच्या म्हणजेच बारावीच्या परीक्षेत ६९.४६ टक्के (३.२२ लाख) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जे विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यांना मे महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.