अमेरिकेत कर्जाची मर्यादा वाढवून देण्याची १७ ऑक्टोबरची कालमर्यादा जवळ येत असताना कर्जमर्यादा वाढवून देण्यात येईल असे संकेत मिळाल्याने अमेरिका दिवाळखोर बनण्याची भीती संपुष्टात येणार आहे. सिनेटच्या नेत्यांनी याबाबत काही वाटाघाटी केल्याचे समजते. अमेरिका दिवाळखोर झाली तर तिची विश्वासार्हता जाईल व जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसेल, यामुळे तातडीने तोडगा काढून तो अमलात आणला जाईल. अमेरिकेत आर्थिक पेचप्रसंगाचा तिसरा आठवडा सुरू असून काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना परत कामावर बोलावण्यात आले आहे. सिनेटर हॅरी रीड व रिपब्लिकन नेते मिश मॅककॉनेल यांनी आर्थिक पेचप्रसंगावर अटीतटीवर न जाता समजुतीच्या भूमिकेतून चर्चा केली. अतिशय व्यवहार्य स्वरूपाचा तोडगा यात काढला जाईल व पुन्हा सरकारचे कामकाज सुरू होईल. देशाची देणी दिली जातील व दीर्घकालीन उपाययोजना केल्या जातील असे रीड यांनी सांगितले. सिनेटच्या अधिवेशनात त्यांनी सांगितले की, या दिशेने बरीच प्रगती झाली आहे त्यामुळे बाजारपेठेवरील तणाव कमी झाला आहे. प्रत्येकाने वाट पाहावी. उद्याचा दिवस आशादायी आहे.
मॅककॉनेल यांनी सांगितले की, आपणही आशावादी असून दोन्ही गटांना सन्मान्य असा तोडगा काढला जाईल. अमेरिकेच्या अर्थ खात्याकडील रोख रक्कम संपत चालली असून रीड-मॅककॉनेल यांच्यातील चर्चा हा त्यातील अखेरचा प्रयत्न आहे. यात रिपब्लिकन नेते जॉन बोहनर हे त्यांच्या आघाडीचा या प्रस्तावाला पाठिंबा मिळवून तो ओबामा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात किती यशस्वी होतात यावर बरेच काही अवलंबून आहे.
नोबेल विजेते शीलरही आशावादी
अर्थशास्त्राचे नोबेल मिळालेले रॉबर्ट शीलर , युजीन फॅमा व  हॅनसेन यांनी या सगळ्या पेचप्रसंगातून अमेरिका बाहेर पडेल व दिवाळखोर बनणार नाही असे म्हटले आहे. येल विद्यापीठाचे प्रा. रॉबर्ट शीलर यांनी सांगितले की,नोबेल देण्यात आले असल्याचे सांगणारा फोन आल्यावर अर्थातच आनंद झाला. नोबेल मिळेल अशी अपेक्षा नव्हती. फोनमुळे आनंद झाला तसेच आश्चर्यही वाटले. शटडाऊन विषयी विचारले असता ते म्हणाले की, अमेरिका दिवाळखोर बनेल असे काही घडणार नाही. फार मोठे गंभीर आर्थिक परिणाम होतील असेही वाटत नाही. अमेरिकेत सध्या असमानता वाढते आहे तशीच ती जगात इतरत्रही वाढते आहे, त्याचा धोका मोठा आहे. त्याचा आताच विचार करायला हवा, नंतर वेळ निघून गेलेली असेल. वेळ आली तर श्रीमंतांवर कर वाढवण्याची आकस्मिक योजना तयार ठेवायला हवी. अजूनही बरेच काही करता येईल. अर्थशास्त्र म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचे उपाय असा एक समज आहे, पण अर्थशास्त्र हा मानवी कृतींचा व उपलब्ध साधनांचा अभ्यास आहे. आपण पूर्वीचा इतिहास बघितला तर तो आर्थिक पेचप्रसंगांचा आहे. त्या प्रत्येकवेळी प्रतिसादातून आपण आणखी अनेक पावले पुढे टाकलेली आहेत, म्हणजेच त्यातून बरेच काही शिकलो आहे.