Manipur Women’s Violence Update : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत जमाव महिलांना विवस्त्र करून रस्त्याने घेऊन जाताना आणि नंतर एका शेतात घेऊन जाताना दिसला. यात जमावातील काही लोक पीडितेच्या शरीराला ओरबाडत विटंबना करत असल्याचंही दिसलं. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. आता शुक्रवारी (२१ जुलै) पीडितेंवर अत्याचार करणाऱ्या व्हिडीओतील मुख्य आरोपीचं घर अज्ञातांनी जाळलं आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिलं आहे.
मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय तणाव निर्माण होऊन हिंसाचार झाला. यानंतर एक दिवसाने जमावाने या महिलांना विवस्त्र करत त्यांच्यावर अत्याचार केले. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ बुधवारी (१९ जुलै) इंटरनेटवरील निर्बंध शिथिल केल्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ही घटना समोर आली. यानंतर राज्य व केंद्र सरकार खडबडून जागे झाले. आतापर्यंत या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मणिपूर हिंसाचारावर अनेक उच्चस्तरीय बैठका, मात्र विवस्त्र धिंडीची दखल नाही
दरम्यान, मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढून अत्याचाराचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर मणिपूर आणि दिल्लीत हिंसाचारावर अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या. मात्र, तरीही गुन्हा दाखल होऊन ६२ दिवस हे प्रकरण अडगळीत पडल्याचंही समोर आलं आहे. २७ मे रोजी चिफ ऑफ आर्मी स्टाफ मनोज पांडे यांनी मणिपूरला भेट देत सुरक्षेचा आढावा घेतला. २९ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चार दिवसीय मणिपूर दौरा करत सुरक्षाविषयक अनेक बैठका केल्या. तसेच विविध समाजघटकांशी चर्चा केल्या.
हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
४ जून २०२३ रोजी केंद्र सरकारने गुवाहटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अजई लांबा यांच्या नेतृत्वात चौकशी आयोगाची स्थापना केली. १० जून रोजी नॉर्थ इस्ट डेमॉक्रेटिक अलायन्सचे प्रमुख आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी इंफाळला भेट दिली. तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री सिंह यांच्यासह अनेकांबरोबर बैठका केल्या. त्यांनी आसाममधील कुकी समाजाच्या नेत्यांशीही चर्चा केली.
२४ जून रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक दिल्लीत पार पडली. यानंतर २६ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.