Crime News: राजधानी दिल्लीला हादरवून सोडणारे अनेक भीषण गुन्हे आजवर अनेकदा चर्चेत आले होते. २०१८ मधील अशीच एक घटना आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. २३ वर्षीय फोटोग्राफर तरुण अंकित सक्सेना याला त्याच्या १९ वर्षीय प्रेयसीच्या म्हणजेच शेहजादीच्या कुटुंबाने भररस्त्यात गळा चिरून मरण्यासाठी सोडून दिले होते. आंतरधर्मीय लग्नांमुळे झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये हे प्रकरण क्रूरतेची साक्ष देणारे ठरले होते. नेमकं १ फेब्रुवारी २०१८ ला घडलं काय होतं याचा हा सविस्तर आढावा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १ फेब्रुवारी २०१८ रोजी पश्चिम दिल्लीतील रघुबीर नगर येथील त्याच्या घराजवळ अंकितची प्रेयसी शेहजादीच्या कुटुंबियांनी भररस्त्यात अंकितचा गळा चिरला होता. अंकित आणि शेहजादी यांचे धर्म वेगळे असल्याने त्यांच्या नात्याला कुटुंबीयांचा विरोध होता. प्राप्त माहितीनुसार, ही घटना घडण्याआधी अंकितने आपल्या मित्राला शेहजादीला जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यासाठी सुद्धा सांगितले होते

पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा कुटुंबियांकडून अंकित व शेहजादी यांच्या नात्याला विरोध होऊ लागला तेव्हा काही दिवसांनी शेहजादीने घरच्यांना सांगितले होते की, मी आता अंकितला भेटणे व त्याच्याशी बोलणे बंद केले आहे. पण घटनेच्या दिवशी दुर्दैवाने तिच्या अल्पवयीन भावाने तिच्या फोनवर अंकितचा मेसेज पाहिला. शेहजादीने एक वर्षापूर्वीच अंकितशी बोलणं थांबवल्याचे सांगून घरच्यांना फसवले होते हे कुटुंबाच्या लक्षात आल्याचे शेहजादीला सुद्धा समजले होते.

मग, घटनेच्या दिवशी वडील अकबर अली आणि तिचा अल्पवयीन भाऊ टीव्हीवर क्रिकेट सामना पाहत असताना शेहजादीने घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला. तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा उघडला. शेहजादी अंकितच्या घरी गेली असावी असा त्यांना अंदाज आला. ते दोघेही पळून जाण्याआधी त्यांना पकडण्यासाठी शेहजादीचे आई-वडील अकबर अली आणि शहनाज बेगम, तिचे काका मोहम्मद सलीम आणि तिचा भाऊ कसायाचा चाकू घेऊन अंकितच्या घराकडे निघाले होते.

अंकितच्या घरापाशी पोहोचताच त्यांना अंकित बाहेरच सापडला, त्यांच्यात सुरवातीला शाब्दिक बाचाबाची झाली जी लगेच हाणामारीत बदलली. हल्ला करण्यापूर्वी, शेहजादी कुठे आहे हे त्यांनी अंकितला वारंवार विचारलं पण त्याने प्रत्येक वेळी सांगण्यास नकार दिला. त्यावेळेस शेहजादी टागोर गार्डन मेट्रो स्टेशनवर होती, तिच्यावरही हल्ला होऊ शकतो या भीतीने अंकितने त्याचा मित्र नितीनला शेहजादीला पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले होते.

अखेरीस शेहजादीच्या कुटुंबाने अंकितचा गळा चिरून त्याला रस्त्यावरच टाकून पळ काढला. १५ मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंकितला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्याच्या आई वडिलांनी खूप प्रयत्न केले. धक्कादायक घटनेची आठवण सांगताना एका नातेवाईकाने म्हटले की, “रुग्णवाहिका बोलावण्याची विनंती केली ती सुद्धा कोणी ऐकली नाही, कुठलीच रिक्षा- गाडी अंकितसाठी त्यावेळी रस्त्यात थांबली नाही. प्रत्येक जण यायचा, थांबायचा, एक नजर टाकायचा आणि निघून जायचा.”

हे ही वाचा<< “डेटिंग ॲपवर भेटलात, लग्न जुळवणाऱ्या..”, लग्नाचं आश्वासन देत बलात्कार केल्याच्या आरोपाबाबत कोर्टाचे मोठे विधान

अखेरीस, पोलिसांनी अंकितला रुग्णालयात नेलं पण तिथे पोहोचण्याच्या आधीच खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आलं. या हत्येमुळे परिसरात अनेक दिवस भीतीचे वातावरण होते. दरम्यान या प्रकरणी शेहजादीचे कुटुंब आता सहा वर्षांनंतर दोषी सिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How 23 year old ankit saxena killed by 19 year old shehzadi parents over inter faith relation cut throat and left to bleed 15 mins svs
Show comments