Margaret MacLeod : भारतात ९ आणि १० सप्टेंबरला जी-२० समूहाची शिखर परिषद पार पडली. या शिखर परिषदेसाठी जगातील अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. दिल्ली येथे पार पडलेल्या या जी-२० समूहाच्या शिखर परिषदेत जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या जी-२० परिषदेसाठी अनेक ताकदवान देशांतील प्रमुख व्यक्ती आल्या होत्या. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनीसुद्धा या परिषदेला हजेरी लावली होती. पण, सध्या भारतात अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मार्गारेट मॅक्लाउड
यांच्यासंबंधी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मॅक्लाउड यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले.

मार्गारेट मॅक्लाउड या जी-२० निमित्त भारतात आल्या होत्या. यादरम्यान एका हिंदी वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. जेव्हा वाहिनीच्या अँकरने मार्गारेट मॅक्लाउड यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी चक्क हिंदीमध्ये बोलायला सुरुवात केली.
अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या यांना हिंदी बोलता येते, हे बघून अँकरसह सर्वच आश्चर्यचकित झाले. त्यांनी मुलाखतीत भारत-अमेरिका संबंधावर हिंदी भाषेत चर्चा केली.

हेही वाचा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मुलावर गुन्हा दाखल; अध्यक्षपद निवडणूक कठीण होणार?

मार्गारेट मॅक्लाउड यांचा हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडीओसुद्धा खूपच
व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये मॅक्लाउड यांनी हिंदीमध्ये बोलताना सर्व भारतीय आणि जगातील सर्व हिंदी बोलणाऱ्या व्यक्तींना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहेत मार्गारेट मॅक्लाउड आणि त्या हिंदी कशा शिकल्या?

मार्गरेट मॅक्लाउड या अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या आहेत. त्यांना १४ वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना इंग्रजीशिवाय हिंदी, उर्दू, गुजराती, फ्रेंच व जपानी भाषासुद्धा बोलता येते.
मार्गारेट मॅक्लाउड या दिल्लीच्या मुखर्जी नगरमध्ये राहायच्या. तिथे त्या खूप चांगली हिंदी बोलायला शिकल्या. त्यांनी दिल्लीच्या ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिक्षण घेतले.
हिंदी बोलण्यावरून त्या सांगतात, “मी भारतातूनच हिंदी शिकले. भारतीय परराष्ट्र सेवेशी जुळलेल्या काही भारतीय अधिकाऱ्यांकडून मला हिंदी शिकायला मिळाली. भारतात येण्यापूर्वी हिंदी पुस्तकांद्वारे हिंदी शिकण्याचा मी प्रयत्न केला होता.”

सध्या मॅक्लाउड यांचे हिंदी बोलतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अनेक भारतीयांनीसुद्धा या व्हिडीओंवर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How america us state departments spokesperson margaret macleod speak hindi so well who is margaret macleod and her life journey and india connection ndj