उत्तर प्रदेशची लोकसंख्या २१ कोटीपेक्षा जास्त असल्याने तेथे कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखणार तरी कशी, असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी केला आहे. तेथे त्यांचेच पुत्र अखिलेश यादव मुख्यमंत्री असल्याने या विधानावर आता नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत़
उत्तर प्रदेश व दिल्लीची तुलना होणार नाही. उत्तर प्रदेश दिल्लीपेक्षा दहापट मोठा आहे. असे असूनही उत्तर प्रदेशच्या दहा पट गुन्हे दिल्लीत होतात. मोठी लोकसंख्या असताना उत्तर प्रदेशात चांगल्या कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा कशी ठेवता येईल, असे यादव म्हणाले.
मुझफ्फरनगर दंगल हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकार कमी पडले, अशी टीका होत असतानाच मुलायमसिंग यांचे विधान हे प्रक्षोभक ठरणार आहे. राज्यसभेत ५ फेब्रुवारीला जी माहिती देण्यात आली त्यानुसार २०१३ मध्ये उत्तर प्रदेशात २४७ जातीय दंगली झाल्या व त्यात ७७ जण मारले गेले. इतर घटनात ३६० लोक जखमी झाले. जातीय दंगलीच्या घटनांचे ११८ गुन्हे २०१२ मध्ये नोंदले गेले, त्यात ३९ ठार तर ५०० जण जखमी झाले होते . गृह राज्यमंत्री आर.पी.एन सिंग यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

Story img Loader